

पुणे; पुढारी वृत्तसेवा : समाविष्ट गावांमध्ये आरोग्य सुविधा पुरविण्यासाठी 29 आरोग्यवर्धिनी केंद्रांचे महापालिकेचे नियोजन अत्यंत संथगतीने सुरू आहे. 29 पैकी केवळ 9 आरोग्यवर्धिनी केंद्रांच्या डागडुजीचे काम पूर्ण झाले. 15 जूनपर्यंत मुदतवाढ मिळालेली असूनही अद्याप ही केंद्रे प्रत्यक्ष सुरूच झालेली नाहीत. गेल्या आर्थिक वर्षामध्ये 29 आरोग्यवर्धिनी केंद्रांची घोषणा करण्यात आली. यापैकी कोंढवे-धावडे, शिवणे, सिंहगड रस्ता (2), हडपसर, कोथरूड, कोंढवा, बावधन, धनकवडी या 9 ठिकाणी जागा ताब्यात आल्यामुळे केंद्रे कार्यान्वित करण्याबाबत महापालिकेकडून जिल्हा परिषदेला पत्र देण्यात आले.
केंद्रांच्या डागडुजीची, देखभालीची जबाबदारी महापालिकेकडे, तर मनुष्यबळ, औषधे, साधनसाग्रीची जबाबदारी जिल्हा परिषदेकडे असणार आहे. महापालिका प्रत्येक केंद्राच्या देखभालीसाठी 25 लाख, तर ब्रँडिंग आणि सुशोभीकरणासाठी 15 लाख रुपये खर्च करीत आहे. एवढा खर्च करूनही प्रत्यक्ष केंद्रे सुरू करण्यास विलंब का, हा प्रश्न अनुत्तरितच राहिला आहे.
मनुष्यबळ, औषधे उपलब्ध करून देण्याची आमची सर्व तयारी पूर्ण झाली असून, महापालिकेचे काम पूर्ण झाले नसल्याचे जिल्हा परिषदेकडून सांगण्यात येत आहे. तर, काम पूर्ण झाल्याचे पत्र दिल्याचे महापालिकेचे म्हणणे आहे. त्यामुळे आरोग्यवर्धिनी केंद्रांचा चेंडू नेमका कोणाच्या कोर्टात राहणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
समाविष्ट गावांमधील नागरिकांना आरोग्य सुविधा देण्याच्या दृष्टीने आरोग्यवर्धिनी केंद्रे सुरू करण्यात येत आहेत. दिरंगाई होऊ नये म्हणून वेगाने काम सुरू असून, जिल्हा परिषदेला पत्र देण्यात आले आहे. नवीन आर्थिक वर्षात आणखी 96 केंद्रे सुरू करण्यात येणार आहेत.
– डॉ. भगवान पवार, आरोग्यप्रमुख, पुणे
हेही वाचा