Sahitya Sammelan President Pudhari
पुणे

Sahitya Sammelan: ५ व्या राजकुमार काळभोर स्मृती साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी साहित्यिका आरती झोटिंग यांची निवड

१६ ऑगस्टला पुण्यात रंगणार साहित्य संमेलन; स्त्रीवादी लेखनासाठी प्रसिद्ध असलेल्या आरती झोटिंग यांच्या अध्यक्षतेखाली विविध साहित्यिक कार्यक्रमांचे आयोजन

पुढारी वृत्तसेवा

पुणे: अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ५ व्या राजकुमार काळभोर स्मृती साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिका आरती झोटिंग यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे. ही माहिती परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. शरद गोरे यांनी दिली.

हे साहित्य संमेलन १६ ऑगस्ट २०२६ रोजी पुण्यातील महात्मा फुले सांस्कृतिक भवन येथे होणार आहे. राज्यभरातील साहित्यिक, कवी, लेखक आणि साहित्यप्रेमी मोठ्या संख्येने या संमेलनाला उपस्थित राहणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.

स्त्रीवादी लेखनामुळे विशेष ओळख

आरती झोटिंग या मराठी साहित्यातील परिवर्तनवादी आणि स्त्रीवादी विचारांच्या लेखिका म्हणून ओळखल्या जातात. त्यांच्या लेखनात सामाजिक प्रश्न, स्त्रीजीवन आणि परिवर्तनाची भूमिका ठळकपणे दिसून येते. 'मनकवडा' हा त्यांचा काव्यसंग्रह विशेष गाजला असून त्यांनी आतापर्यंत पाच ग्रंथांचे लेखन केले आहे. त्यांच्या साहित्यिक योगदानाबद्दल त्यांना विविध प्रतिष्ठित पुरस्कारांनीही सन्मानित करण्यात आले आहे.

नियोजन बैठकीत संमेलनाची रूपरेषा निश्चित

साहित्य संमेलनाच्या नियोजनासाठी नुकतीच पुण्यात डॉ. शरद गोरे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. या बैठकीत संमेलनाचा कार्यक्रम आणि विविध उपक्रमांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.

बैठकीला राष्ट्रीय उपाध्यक्षा शुभांगी काळभोर, पुणे विभागीय अध्यक्ष सूर्यकांत नामुगडे, सुकाणू समिती सदस्य किशोर टिळेकर, महाराष्ट्र प्रदेश संघटक दत्तात्रय भोंगळे, प्रदेश सरचिटणीस विक्रम शिंदे, सुनील लोणकर, सचिव अमोल कुंभार, पश्चिम महाराष्ट्र युवा अध्यक्ष ॲड. सुमेध गायकवाड, पुणे शहराध्यक्ष ज्ञानेश्वर धायरीकर, शहर सचिव बाळकृष्ण अमृतकर, संघटक योगेश चौधरी, कार्याध्यक्ष सिंधु साळेकर, पुणे विभागीय महिला उपाध्यक्षा शर्मिला गायकवाड यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

असे असेल संमेलनाचे स्वरूप

संमेलनाची सुरुवात ग्रंथपूजनाने होणार आहे. त्यानंतर उद्घाटन समारंभ, पुस्तक प्रकाशन, पुरस्कार वितरण, कथाकथन, कविसंमेलन आणि विविध साहित्यिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. राज्यभरातील अनेक नामवंत साहित्यिक या संमेलनात सहभागी होणार आहेत.

१९७ वे मराठी साहित्य संमेलन

अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेच्या वतीने आयोजित करण्यात येणारे हे १९७ वे मराठी साहित्य संमेलन असून, मराठी साहित्य, संस्कृती आणि विचारांची समृद्ध परंपरा जपणारा हा महत्त्वाचा साहित्यिक सोहळा ठरणार असल्याचा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT