पुणे : पुढारी वृत्तसेवा : राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद अर्थात विद्या प्राधिकरणाने तीन ते आठ वर्षांच्या विद्यार्थ्यांसाठी नेमका अभ्यासक्रम कसा असावा, याचा एक आराखडा जाहीर केला आहे. यामध्ये लहान वयापासूनच कलाशिक्षण देण्याचा निर्णय झाला आहे. कला ही सर्जनशीलतेचा आविष्कार असून म्युझिक थेरपी, कलर थेरपी इत्यादींद्वारे कुठल्याही दुष्परिणामांशिवाय रोगचिकित्सा करण्यात येत असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
कला एक प्रभावी उपचारपद्धती म्हणून आज कलांचा फार मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. म्युझिक थेरपी, कलर थेरपी इत्यादींद्वारे आज कुठल्याही दुष्परिणामांशिवाय रोगचिकित्सा केली जाते. इतकी सक्षमता कलांमध्ये असते. त्यामुळे अगदी लहान वयापासून मुलांना कलांचे शिक्षण दिले गेले, तर त्यांचे संपूर्ण आयुष्य नक्कीच समृद्ध, संपन्न होईल, हाच विचार या अभ्यासक्रमात करण्यात आला आहे.
कला शिक्षणाचे महत्त्व लक्षात घेऊन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 मध्ये वयवर्षे 3 ते 8 वर्षांच्या वयोगटासाठी शालेय शिक्षणात कलांचा अंतर्भाव करण्याची खास शिफारस करण्यात आली आहे.
विद्यार्थ्यांच्या सुयोग्य व्यक्तिमत्त्वाचा विकास घडून यावा, यासाठी त्या कलांचे शिक्षण घेणे आवश्यक ठरते. स्वयंशिस्त, आत्मसंतुलन, संवेदनशीलता, राष्ट्रीय एकात्मता, सामूहिक भावना इत्यादी समाजाभिमुख गोष्टी या कलेद्वारे सहजपणे अंगी बाणवता येतात. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होऊन त्याचे आयुष्य धकाधकीच्या तणावपूर्ण, स्पर्धात्मक युगात कोमेजून न जाता आनंददायकरीतीने व्यतीत व्हावे, हा मूलभूत विचार अभ्यासक्रमात केला गेला आहे. कौटुंबिक, सामाजिक, आर्थिक विविध स्तरांतून आलेल्या विद्यार्थ्यांना एका समपातळीवर आणून उदात्त असा जीवनानुभव देणे, हा उद्देश आहे. कला अध्ययनाशी तादात्म्य पावल्यावर लिंग, जात, धर्म या सर्व गोष्टी विसरून सामूहिक भावना वाढीला लागते. विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वातील विविध पैलूंचा विकास होण्यासाठी हा पाठ्यक्रम पूरक ठरणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
बुद्धीची कुशाग्रता कलेमुळेच विकसित
प्रभावी नेतृत्वगुण, रसग्रहण सौंदर्यद़ृष्टी, क्षमता, जबाबदारी, कल्पकता, जागरूकता इत्यादींचा विकास होईल. बुद्धीची कुशाग्रता ही कलेमुळे विकसित होते. कलेतून शिक्षण, कलेचे शिक्षण आणि कला हेच शिक्षण ही त्रिसूत्री जोपासली जावी, यासाठी विविध अध्ययन अनुभव दिलेले आहेत. त्यातून कलाशिक्षणासाठी पोषक व अनुकूल वातावरण तयार होण्याबरोबरच कलेची आवडही निर्माण होणार आहे.
भाषा व गणित विषयांमध्येच परिसर अभ्यास
पायाभूत स्तरांमध्ये पूर्व प्राथमिकची तीन वर्षांसाठी बालवाटिका-1, बालवाटिका-2, बालवाटिका-3 यासाठी शिक्षक हस्तपुस्तिका केल्या जातील. पहिली व दुसरीकरिता भाषा (मराठी, इंग्रजी), गणित, कार्यशिक्षण, कलाशिक्षण, शारीरिक शिक्षण हे विषय राहतील आणि भाषा व गणित या विषयांमध्येच परिसर अभ्यास हा विषय समाविष्ट असेल, असेही स्पष्ट करण्यात आले.
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.
'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.
Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.