पुणे

आळेफाटा उपबाजारात नवीन कांद्याची आवक

अमृता चौगुले

आळेफाटा : पुढारी वृत्तसेवा : कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आळेफाटा उपबाजारात नवीन लाल कांद्याची आवक वाढत आहे. शुक्रवारी (दि. 15) 28 हजार 700 गोणी कांदा विक्रीस आला होता. लिलावात प्रती 10 किलोस 270 रुपये कमाल दर मिळाल्याची माहिती सभापती संजय काळे, संचालक प्रीतम काळे यांनी दिली. आळेफाटा उपबाजारात झालेल्या लिलावात कांदा दरात घसरण झाली. दिवाळीनंतर उन्हाळी गावरान कांद्याची आवक कमी होऊ लागली व पावसाळी हंगामातील लाल कांदा विक्रीस येऊ लागला आहे.
आता लाल कांदा मोठ्या प्रमाणात विक्रीस येत आहे.

मध्यंतरी झालेला अवकाळी पाऊस व ढगाळलेले वातावरण यामुळे लाल कांदा उत्पादकांचे नुकसान झाले. त्यातच केंद्र सरकारने बाजारपेठांमधील कांद्याचे दर नियंत्रणात आणण्यासाठी पुन्हा एकदा 8 डिसेंबरपासून निर्यातबंदी केल्याने दरात घसरण झाली. यामुळे शेतकरीवर्ग त्रस्त झाला आहे. मंगळवारी झालेल्या लिलावात 21 हजार गोणी नवीन लाल कांदा विक्रीस आला होता, शुक्रवारी पुन्हा आवक वाढली. सध्या तालुक्याच्या पूर्व भागात व शेजारील संगमनेर, पारनेर तालुक्याचे पठार भागात लाल कांद्याची काढणी सुरू आहे, त्यामुळे येथील आवक वाढली असल्याचे सचिव रूपेश कवडे, कार्यालय प्रमुख प्रशांत महांबरे यांनी सांगितले.

हेही वाचा :

SCROLL FOR NEXT