चाकण : पुढारी वृत्तसेवा : हॉटेल व्यावसायिकाला जबर मारहाण करून त्याच्या गळ्यातील पंधरा तोळे सोन्याची साखळी जबरदस्तीने चोरून नेल्याची धक्कादायक घटना बहुळ (ता. खेड) हद्दीत घडली होती. चाकण पोलिसांनी या गुन्ह्याचा छडा लावून अवघ्या 12 तासांच्या आत तीन अट्टल चोरट्यांना अटक केली आहे. चोरांकडून सोनसाखळीसह 3 लाख 70 हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. खेड न्यायालयाने आरोपींना 5 सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
श्रीराम संतोष होले (वय 25, रा. होलेवाडी, ता. खेड), प्रतीक ऊर्फ बंटी दत्तात्रय टाकळकर (वय 21, रा. टाकळकरवाडी, ता. खेड) व बबलू रमेश टोपे (वय 23, रा. वाकी बु., ता. खेड) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी सतीश कुंडलीक गव्हाणे (वय 57, रा. कोरेगाव भीमा, ता. शिरूर) यांनी चाकण पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बहुळ गावच्या हद्दीत चाकण-शिक्रापूर रोडलगत हॉटेल एस. के. येथे तीन अनोळखी चोरट्यांनी मोटारसायकलवर येऊन फिर्यादी व साक्षीदार यांना लाकडी दांडके व पाइपने मारहाण केली. त्यानंतर फिर्यादी गव्हाणे यांच्या गळ्यातील पंधरा तोळे वजनाची सोन्याची साखळी जबरीने हिसकावून चोरटे दुचाकीवरून पळून गेले. याप्रकरणी सतीश गव्हाणे यांनी चाकण पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.
दरम्यान, गुन्हा दाखल होताच पोलिसांनी ठिकठिकाणी सापळा लावून तिघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता आरोपींनी वरील गुन्ह्याची कबुली पोलिसांना दिली आहे. चोरट्यांकडून सोन्याची साखळी व गुन्हा करण्यासाठी वापरलेली दुचाकी असा 3 लाख 70 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. यातील आरोपी सराईत गुन्हेगार असून, यापूर्वी त्यांच्यावर चोरी, जबरी चोरी, अवैध शस्त्र बाळगणे, अशा प्रकारचे गुन्हे दाखल असल्याचे चाकण पोलिसांनी सांगितले. याबाबतचा अधिक तपास चाकणचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक वैभव शिंगारे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक विक्रम गायकवाड, पोलिस उपनिरीक्षक अमोल डेरे व त्यांचे सहकारी करीत आहेत. तिन्ही आरोपींना खेड न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना 5 सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
हेही वाचा :