पुणे

पिंपरी परिसरातील दारू धंदेवाल्यांची धरपकड; सहा ठिकाणी छापेमारी

अमृता चौगुले

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा

पिंपरी-चिंचवड शहर परिसरात अवैध दारू विक्री करणार्‍यांची पोलिसांनी धरपकड सुरू केली आहे. रविवारी (दि. 29) एकाच दिवशी पोलिसांनी सहा ठिकाणी छापेमारी केली. याप्रकरणी दिघी, पिंपरी आणि हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
दिघी पोलिसांनी आळंदी देवाची येथे इंद्रायणी नदीच्या घाटावर रविवारी (दि. 29) सकाळी सव्वा अकराच्या सुमारास कारवाई केली.

राजकुमार छत्रपाल यादव (वय 19), व्यंकटेश माधवराव मठपती (20, दोघेही रा. आळंदी देवाची) यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला. व्यंकटेश मठपती याच्या सांगण्यावरून राजकुमार यादव याने विक्रीसाठी चार हजार 320 रुपये किमतीच्या देशी दारुच्या बाटल्या बाळगल्याचे समोर आले आहे.

पिंपरी पोलिसांनी रविवारी विठ्ठलनगर, नेहरूनगर, पिंपरी येथे कारवाई केली. उजनवती संपत सुरवसे (48, रा. विठ्ठलनगर) आणि सोन्या (वय 27, रा. भाटनगर, पिंपरी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला. उजनवती सुरवसे ही महिला 520 रुपये किमतीची पाच लिटर गावठी हातभट्टीची दारू विक्री करताना मिळून आली. आरोपी सोन्या याने विक्रीसाठी महिलेला दारू आणून दिल्याचे चौकशीत समोर आल्याने त्याच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अंमली पदार्थ विरोधी पथकाने शनिवारी (दि. 28) पुनावळे येथे कारवाई केली. सुधीर कमल मंडल (वय 35, रा. पुनावळे) याच्यावर हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. आरोपीने विनापरवाना विक्रीसाठी दोन हजार 100 रुपयांची दारू बेकायदेशीरपणे त्याच्या ताब्यात बाळगली होती. याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी छापा मारला.

हिंजवडी पोलिसांनी रविवारी हिंजवडी येथे कारवाई करून अजय लालूराम कर्मावत (20, रा. हिंजवडी) याला अटक केली. त्याच्यासह समाधान महादेवराव दोडके (37, रा. म्हाळुंगेगाव, ता. मुळशी) याच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. हिंजवडी पोलिसांनी दुसरी कारवाई माण येथे केली. संतोष परशुराम राठोड (43, रा. भोईरवाडी, ता. मुळशी) याला अटक करून त्याच्यासह भगवान भाऊसाहेब भोईर (68, रा. भोईरवाडी, ता. मुळशी) याच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

चाकण पोलिसांनी नाणेकरवाडी गावाच्या हद्दीत रविवारी (दि. 29) सायंकाळी साडेसातच्या सुमारास कारवाई केली. श्रीकांत राजेंद्र कोळी (वय 25, रा. नाणेकरवाडी) याला अटक करण्यात आली आहे. आरोपीकडे दोन हजार 700 रुपयांची देशी दारु विनापरवाना मिळून आली. पोलिसांनी अचानक हल्लाबोल केल्याने अवैध धंदेवाले सैरभैर झाल्याचे चित्र सध्या शहरात पाहवायस मिळत आहे.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT