Devendra Fadnavis big announcement
पुणे: व्हिसा घेऊन आलेल्या पाकिस्तानी नागरिकांना नोटिसा दिल्या असून, त्यांची परत पाठविण्याची व्यवस्था केली आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले. देशाची अस्मिता आणि सुरक्षितता महत्त्वाची असून, केंद्र सरकारने घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
ग्रामविकास विभागाच्या राज्यस्तरीय कार्यशाळेसाठी फडणवीस पुण्यात यशदा येथे आले होते. त्या वेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. पाकिस्तानमधून उपचारासाठी काही नागरिक आले असल्याबाबत विचारणा केली असता, फडणवीस म्हणाले, त्यांच्याविषयी सहानुभूती आहे.
मात्र, पाकिस्ताननेही तेथील भारतीय नागरिकांना परत जाण्यास सांगितले आहे. शेवटी याबाबतचे निर्णय केंद्र सरकार घेत असते. पाकिस्तानचे सरकार दहशतवादाचे समर्थन करते. जगातील कोणताही देश त्यांच्या पाठीशी उभा राहिला नाही. राज्यात व्हिसा घेऊन आलेल्या पाकिस्तानी नागरिकांची माहिती पोलिसांकडे होती. त्यांना नोटिसा दिल्या. त्यांना परत पाठविण्याची व्यवस्था झाली आहे. बांगलादेशी अवैध नागरिक आढळतात, तसेच पाकिस्तानातील अवैध नागरिक आढळत नाहीत. मात्र, त्यांचा शोध घेण्याची निरंतर प्रक्रिया सुरू असते, असे फडणवीस यांनी सांगितले.
जिल्ह्यातील काँग्रेस संपली
भोर येथील माजी आमदार संग्राम थोपटे भाजपमध्ये गेल्याने जिल्ह्यातील काँग्रेस संपली का, अशी विचारणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केली असता ते म्हणाले, काँग्रेस स्वतःच कोठे शिल्लक नाही. ते दाखवा असा टोला त्यांनी मारला.
राज्य सरकार सहाही परिवारांच्या पाठीशी
गनबोटे आणि जगदाळे यांच्या कुटुंबीयांची फडणवीस यांनी भेट घेतली. काश्मीरमध्ये महाराष्ट्रातील ज्या सहा परिवारातील लोक मृत्युमुखी पडले, त्यांच्या परिवाराला आवश्यक ती सर्व मदत राज्य सरकार करेल, असे फडणवीस यांनी सांगितले. ज्येष्ठ नेते शरद पवार आणि प्रकाश आंबेडकर यांची वक्तव्ये ऐकली नसल्याचे, त्यावर भाष्य करण्याचे फडणवीस यांनी टाळले. ते म्हणाले, अतिरेक्यांनी नागरिकांना मारतात धर्म विचारला की नाही, याबाबत मला वाद करायचा नाही, ही वेळही ती नाही. सिंधू करार रद्द केल्याचा तातडीने परिणाम दिसणार नाही. मात्र, हा मोठा निर्णय असून, पाकिस्तानवर तहानेने मरण्याची वेळ येईल.