

जोगेश्वरी : अंधेरी पश्चिमेकडील लोखंडवाला अशोक अकादमी रोडवरील ब्रोकलीन या रहिवासी इमारतीला शनिवारी पहाटे पावणे तीनच्या सुमारास लागलेल्या भीषण आगीत गुदमरलेल्या अभिना कार्तिक संजनवालिया (34) या महिलेचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला, तर धुरामुळे 6 जण अत्यवस्थ झाले असून त्यांच्यावर महापालिकेच्या कूपर, ट्रॉमा केअर आणि कोकिळाबेन अंबानी रुग्णालयांत उपचार सुरू आहेत. या आगीत 2 पाळीव श्वान आणि एका मांजरीचासुद्धा होरपळून मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.
ही इमारत 8 मजली असून पहिल्या मजल्यावरील फ्लॅट क्रमांक 104 मध्ये आग लागली. एसी यंत्रणेत शॉर्टसर्किट झाल्यामुळे इलेक्ट्रिक वायरला आग लागून दुर्घटना झाल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. आग मोठ्या प्रमाणात फ्लॅटमध्ये पसरली, यामध्ये इलेक्ट्रिक वायरिंग, स्प्लिट व विंडो एसी युनिट, लाकडी फर्निचर, कागदपत्रे, गाद्या, कपडे व इतर घरातील महत्त्वाच्या वस्तू जळून खाक झाल्या. अग्निशमन दलाच्या जवानांमार्फत ही आग पहाटे साडेपाच वाजेपर्यंत आटोक्यात आणण्यात यश आले.
या आगीत जखमी झालेले कार्तिक संजनवालिया (40) यांना कूपर हॉस्पिटलच्या आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले आहे. कोकिलाबेन रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या इतरांमध्ये अपर्णा गुप्ता (41), दया गुप्ता (21), रिहान गुप्ता (3) आणि 10 दिवसांचे अर्भक प्रद्युम्ना यांचा समावेश आहे. या सर्वांवर डॉ. सिद्धार्थ यांच्या देखरेखीखाली आयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत. पोलम गुप्ता (40) यांनाही धुराचा फटका बसला होता, त्यांच्यावर ट्रॉमा हॉस्पिटलच्या अतिदक्षता विभागात उपचार करण्यात आले असून प्राथमिक उपचार केल्यानंतर घरी सोडण्यात आले. या आग प्रकरणाची चौकशी अग्निशमन दल आणि पोलिसांमार्फत सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.