सुरळीत पार पडली 'नीट'; उन्हाच्या तडाख्यातही पुण्यातील 41 परीक्षा केंद्रांवर विद्यार्थ्यांची हजेरी  file photo
पुणे

NEET 2025: सुरळीत पार पडली 'नीट'; उन्हाच्या तडाख्यातही पुण्यातील 41 परीक्षा केंद्रांवर विद्यार्थ्यांची हजेरी

NEET Exam 2025: सर्व कागदपत्रे तपासूनच व त्याची पडताळणी करूनच परीक्षा केंद्रात प्रवेश देण्यात आले.

पुढारी वृत्तसेवा

Pune NEET Exam Update

पुणे: वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी घेण्यात येणारी नॅशनल इलिजिबिलीटी एन्ट्रन्स टेस्ट अर्थात नीट ही राष्ट्रीय स्तरावरील प्रवेश परीक्षा शहरात सुरळीत पार पडली. पुण्यात साधारण 21 हजार 600 विद्यार्थ्यांची परीक्षेसाठी नोंदणी करण्यात आली होती. पुण्यात एकूण 41 केंद्रांवर संबंधित परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते. ऐन दुपारी 2 ते 5 या वेळेत परीक्षा असल्याने उन्हाच्या कडाक्यातही विद्यार्थी आणि पालकांची परीक्षा केंद्रांवर हजेरी दिसून आली.

रविवारी पुण्यासह देशभरात ‘नीट’ परीक्षा दि. 2 ते 5 या वेळेत पार पडली. गतवर्षी नीट परीक्षेत झालेल्या गैरप्रकाराच्या पार्श्वभूमीवर यंदा ‘नीट’ परीक्षेला पोलिस बंदोबस्तात घेण्यात आला. त्यामुळे प्रत्येक परीक्षा केंद्रावर 5 ते 6 पोलिसांचा बंदोबस्त असल्याचे पाहायला मिळाले. तसेच काही अनुचित प्रकार होऊ नये यासाठी विशेष काळजी घेण्यात आली. (latest pune news)

प्रत्येक परीक्षा केंद्रातील परीक्षा होत असलेल्या रूममध्ये दोन कॅमेरे बसविण्यात आले होते. त्यामुळे विद्यार्थ्यांना कोणतीही हालचाल करण्याची संधी उपलब्ध नव्हती. दरम्यान, नॅशनल टेस्टिंग एजन्सी यांच्यामार्फत नीट परीक्षा घेण्यात येते. परीक्षेपूर्वी त्यांनी सर्व सूचना विद्यार्थ्यांना व त्यांच्या हॉल तिकीटवर देण्यात आल्या होत्या. सर्व कागदपत्रे तपासूनच व त्याची पडताळणी करूनच परीक्षा केंद्रात प्रवेश देण्यात आले.

दरम्यान, मुलांना परीक्षा केंद्रात सोडण्यासाठी आलेल्या पालकांची मोठी गर्दी झाली होती. विद्यार्थ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, नीट परीक्षेत भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्र विषयातील प्रश्नांची काठिण्यपातळी काहीशी वरचढ असल्याचे दिसून आले. परंतु यंदा संबंधित परीक्षा सुरळीत पार पडली असल्याचे स्पष्ट झाले आहे.

पालकांनी घेतला झाडांचा आश्रय

पुण्यात सध्या उन्हाचा कडाका चांगलाच जाणवत आहे. त्यातच भरदुपारी 2 ते 5 या वेळेत नीट परीक्षेचा पेपर असल्याने विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रांवर सोडविण्यास आलेल्या पालकांना चांगलाच घाम फुटल्याचे दिसून आले. गणेशखिंड परिसरातील पीएमश्री केंद्रीय विद्यालयात विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रांत सोडल्यानंतर पेपर संपेपर्यंत पालकांनी रस्त्यावरील झाडाचा आश्रय घेतल्याचे पाहायला मिळाले.

पुण्यात 41 केंद्रांवर नीट परीक्षा सुरळीत पार पडली. नॅशनल टेस्टिंग एजन्सी अर्थात एनटीएच्या सूचनांनुसार परीक्षा घेण्यात आली. परीक्षेत कोणताही व्यत्यय आला नाही. पुण्यात 21 हजार 600 विद्यार्थ्यांनी संबंधित परीक्षा देणे अपेक्षित होते.
- उमाकांत कडनुर, तहसीलदार, उपजिल्हाधिकारी कार्यालय

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT