

43 Lakh Cyber Scam
पुणे: केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाकडून (सीबीआय) बोलत असून, तुमच्या आधारकार्डवर 50 केसेस दाखल असल्याची भीती दाखवून एका तरुणाची सायबर चोरट्यांनी 42 लाख 95 हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे.
याप्रकरणी बाणेर पोलिसांनी सायबर चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याबाबत 23 वर्षीय तरुणाने बाणेर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, सायबर चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तक्रारदार तरुण बालेवाडी भागात राहायला आहे.
ही घटना 2 ते 9 सप्टेंबर 2024 दरम्यान घडली आहे. तक्रारदार तरुणाशी संपर्क करून सायबर चोरट्यांनी दिल्लीतील सीबीआय कार्यालयातून अधिकारी बोलत असल्याचे सांगितले. ‘तुमच्या नावाची ओळख कोणीतरी वापरत आहेत.
तुमच्या आधारकार्डवर 50 गुन्हे दाखल केले आहेत. या प्रकरणात ‘सीबीआय’कडून कारवाई करण्यात येणार आहे, अशी भीती चोरट्यांनी तरुणाला दाखविली. त्यानंतर कारवाई न करण्यासाठी तातडीने पैसे भरावे लागतील, असे सांगितले. (Latest Pune News)
तरुणाने वेगवेगळ्या बँक खात्यात 42 लाख 95 हजार रुपये जमा केले. चोरट्यांनी त्यांच्याकडे आणखी रक्कम मागितली. यांनतर तरुणाने तक्रार दाखल केली. या प्रकरणाचा तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक चंद्रशेखर सावंत करत आहेत.
बतावणीकडे दुर्लक्ष करा!
ईडी, सीबीआय, नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरो अशा तपास यंत्रणांकडून कारवाई करण्यात येणार असल्याची बतावणी करून नागरिकांची फसवणूक करण्याचे प्रकार वाढीस लागले आहेत. नागरिकांनी अनोळखी क्रमांकावरून आलेल्या चोरट्यांच्या बतावणीकडे दुर्लक्ष करावे, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.