पुणे

पुणे : 29 ‘आरोग्यवर्धिनी’ केंद्रे जाहीर; प्रत्यक्षात मात्र चारच सुरू

अमृता चौगुले

पुणे : कामगारवर्गाला सायंकाळी औषधोपचार करण्याच्या उद्देशाने समाविष्ट गावांमध्ये सुरू केलेली चारही आरोग्यवर्धिनी केंद्रे सायंकाळी साडेपाच वाजताच बंद होत आहेत. कामगारांना त्याचा फायदाच होत नसल्याचे दिसत आहे. महापालिकेने 29 केंद्रे सुरू करण्याचे जाहीर केल्यानंतरही केवळ चारच केंद्रे सुरू झाली आहेत. त्यातच आणखी 96 केंद्रे सुरू करण्याचा प्रस्ताव महापालिकेच्या विचाराधीन आहे.

महापालिकेच्या 29 पैकी कोथरूड, बावधन, हडपसर आणि कोंढवा ही चारच आरोग्यवर्धिनी केंद्रे सुरू झाली आहेत. नव्याने समाविष्ट झालेल्या 34 गावांमध्ये 29 ठिकाणी नवीन आरोग्यवर्धिनी केंद्रे मंजूर करण्यात आली आहेत. यापैकी केंद्र शासनाच्या निकषांनुसार 17 गावांमध्ये जागा उपलब्ध झाल्या आहेत. मागील वर्षीची प्रस्तावित केंद्रे अद्याप सुरू झालेली नसताना नवीन आर्थिक वर्षात आणखी 96 आरोग्यवर्धिनी केंद्रांचा घाट घालण्यात आला आहे. केंद्रांसाठी लागणारे मनुष्यबळ, औषधे जिल्हा परिषदेमार्फत उपलब्ध करून दिली जाणार आहेत. फर्निचर आणि देखभाल-दुरुस्तीचे काम महापालिकेकडे असणार आहे.

स्वच्छतेच्या नियमांना फाटा

बावधन खुर्द येथील ह.भ.प. तुकाराम गेनुजी वेडे-पाटील आरोग्य केंद्रात आरोग्य आणि स्वच्छतेबाबत नियमांचे पालन करण्याचा सल्ला देणारे कर्मचारीच स्वतः नियमांचे उल्लंघन करत असल्याचे प्रामुख्याने दिसून येते. नऊ-सव्वानऊ वाजता आरोग्यकेंद्र सुरू होते आणि सहा वाजता बंद होते. दवाखान्यात येताना 'मास्क लावणे बंधनकारक आहे' या आशयाचा फलक लक्ष वेधून घेतो. डॉक्टर वगळता कोणताही कर्मचारी व नागरिक मास्क वापरत नाही. स्वच्छता, औषधे याबाबत केंद्रामध्ये नियम पाळले जात असल्याचे दिसले.

फार्मासिस्ट नाही

साईबाबानगर येथे महापालिकेचे माँ खदीजा प्रसूतीगृह आहे. सध्या येथे केवळ ओपीडी असून, डॉक्टरसह पाच कर्मचारी आहेत. सध्या येथे गर्भवती महिला, बाळ व आईची तपासणी केली जाते. मात्र, येथे फार्मासिस्टची नेमणूक केलेली नाही. यामुळे रुग्णांना शुगर व बीपीच्या योग्य गोळ्या मिळाव्यात यासाठी डॉक्टरांना काळजी घ्यावी लागते. पाहणीमध्ये आढळून आले की, सकाळी 9:10 वाजता हे हॉस्पिटल सुरक्षारक्षक महिलेने उघडले. काही वेळातच डॉ. अनिता शिंदे व कर्मचारी आले. काही वेळानंतर ताजुद्दीन शबीर शेख, फरीदा नजीम शेख, यासिर चौधरी असे तीन रुग्ण या ठिकाणी आले. त्यांनी केस पेपर काढल्यानंतर डॉ. शिंदे यांनी तपासणी करून औषधे दिली.

रक्त तपासणीची व्यवस्था नाही

कै. रोहन काळे आरोग्य केंद्र नवीन इमारतीमधे सुरू असून काळेपडळ व काळे-बोराटेनगर भागातील रुग्ण उपचारांसाठी येतात. येथे एक वैद्यकीय अधिकारी, पाच नर्स, एक सेवक आहे. दररोज 70 पेक्षा अधिक बाह्यरुग्णांची तपासणी केली जाते. रक्त आणि इतर तपासण्यांसाठी प्रयोगशाळेची गरज असल्याचे जाणवले. रुग्णालयात साठणारा कचरा एके ठिकाणी ठेवण्याची व्यवस्था नाही. या भागात रोजगारानिमित्त बाहेरून येणारा मजूरवर्ग जास्त आहे. मजूरवर्गाचे कामाच्या नादात आरोग्याकडे दुर्लक्ष होते. त्यामुळे आरोग्यवर्धिनी केंद्रांमध्ये आहार आणि व्यायामाबाबत मार्गदर्शन करावे, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

उपचार, औषधे वेळेत मिळेनात

कोथरूडमधील जयभवानीनगर येथील कै. नथुराम शंकर मराठे दवाखान्यात आरोग्यवर्धिनी केंद्र सुरू करण्यात आले आहे. आरोग्याबाबत जागरुकता निर्माण करणारी चित्रे भिंतींवर चितारण्यात आली आहेत. दवाखान्यात योग्य प्रकारे स्वच्छता राखण्यात आली असून, उपचार आणि औषधे वेळेत मिळत असल्याचे दिसले. मात्र, हे केंद्रही सकाळी 9.30 ते संध्याकाळी 5.30 या वेळेतच सुरू राहते.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT