पुणे/वानवडी : उत्साहात उमेदवारांनी अर्ज भरले खरे; पण खरी कसोटी लागली ती अर्जांच्या छानणीवेळी. बुधवारी (दि. 31 डिसेंबर) वानवडी-रामटेकडी-कोंढवा क्षेत्रीय कार्यालयात अर्जांच्या छाननीचे काम सकाळी सुरू झाले अन् उमेदवारांमध्ये छाननीवेळी धाकधूक पाहायला मिळाली.
काय होईल? कसे होईल? अशी चर्चा उमेदवार आणि कार्यकर्त्यांमध्ये रंगलेली दिसून आली आणि छाननीची प्रक्रिया संपण्याची सगळे वाट पाहत होते. वानवडी-रामटेकडी-कोंढवा क्षेत्रीय कार्यालयात प्रभाग क्रमांक 18 वानवडी-साळुंखेविहार, प्रभाग क्रमांक 19 कोंढवा खुर्द-कौसरबाग आणि प्रभाग क्रमांक 41 महंमदवाडी-उंड्री या तीन प्रभागांमधील उमेदवारांच्या अर्जांची छाननी करण्यात आली. या प्रक्रियेत सर्व उमेदवार सहीसलामत बाहेर पडले आहेत.
वानवडी-रामटेकडी-कोंढवा क्षेत्रीय कार्यालयात प्रभाग क्रमांक 18, 19 आणि 41 मधील उमेदवारांच्या अर्जांची बुधवारी छाननी प्रक्रिया पार पडली. सकाळी 9 ते 10 वाजल्यापासून उमेदवार आणि कार्यकर्त्यांनी क्षेत्रीय कार्यालय गाठले. कार्यालयाच्या ठिकाणी सकाळीच उमेदवारांसह कार्यकर्त्यांची गर्दी व्हायला सुरुवात झाली. छाननी प्रक्रियेच्या वेळी बाद झालो तर, देव देतो पण... अशी गत होईल, अशी भीती, चिंता अनेक उमेदवारांच्या मनामध्ये पाहायला मिळत होती.
कार्यालयाच्या ठिकाणी काही उमेदवार एकमेकांशी गप्पा मारतानाही दिसून आले. मी तिकीट कसे मिळविले, माझे नशीब बलवत्तर म्हणूनच मला तिकीट मिळाले, माझ्या नेत्याचा माझ्यावर विश्वास आहे, असा संवाद उमेदवारांमध्ये रंगला होता. तर, काही उमेदवारांमध्ये हव्या त्या पक्षाचे तिकीट मिळाले नाही. पण, ऐनवेळी दुसऱ्या पक्षाने त्यांना तिकीट दिले, अशी चर्चाही रंगली होती.
निवडणुका जाहीर होण्याच्या आधीपासून ज्यांनी पक्षाची धोरणे, पक्षाचे चिन्ह घराघरांत पोहचविले आणि ऐनवेळी तिकीट नाकारल्यामुळे काही जण नाराजही दिसले. छाननी प्रक्रिया बराच वेळ चालली आणि एक-दोन उमेदवारांवरील आक्षेप वगळता सर्वच उमेदवार अर्जांच्या छाननी प्रक्रियेत पास झाले. क्षेत्रीय कार्यालय परिसरात सायंकाळपर्यंत गर्दी होती. छाननी प्रक्रियेत सहीसलामत बाहेर पडल्याचा आनंदही अनेकांच्या चेहऱ्यावर उमटल्याचे वातावरण क्षेत्रीय कार्यालयात बुधवारी पाहायला मिळाले.