पुणे

राजगडाच्या पायथ्याला शिवरायांचा वाडा प्रकाशात; बहामनी काळातील नाणेही सापडले

अमृता चौगुले

दत्तात्रय नलावडे

वेल्हे : हिंदवी स्वराज्याची पहिली राजधानी व छत्रपती शिवाजी महाराज यांचे सर्वाधिक काळ वास्तव्य असलेल्या किल्ले राजगडाच्या पायथ्याला पाल खुर्द येथील शिवरायांच्या शिवापट्टण वाडा स्थळाच्या उत्खननात शिवकालीन दर्जेदार बांधकामाचे अवशेष सापडले आहेत. खोदकामात बहामनी काळातील एक नाणेही सापडले आहे. त्यामुळे या ठिकाणी शिवकालीन खजिना असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. परिणामी प्रशासन सतर्क झाले असून, शिवापट्टण वाडा, तसेच शिवरायांच्या महाराणी सईबाई समाधिस्थळाच्या परिसरात पर्यटक तसेच स्थानिकांना प्रतिबंध करण्यात आला आहे.

छत्रपती शिवरायांचे वास्तव्य शिवापट्टण वाड्यात अनेक वर्षे होते. राजगडाप्रमाणे येथेही स्वराज्याची कचेरी होती. वाड्याच्या सभोवताली 25 ते 30 एकरचा सखल परिसर आहे. शिवापट्टणच्या वाड्याला शिवरायांचा राजवाडा तर त्यांनी तयार केलेल्या फळझाडांच्या बागेला शिवबाग अशी ओळख आहे. गुंजवणी नदीच्या तिरावरील छत्रपती शिवरायांच्या पत्नी महाराणी सईबाई यांच्या समाधिस्थळाचेही खोदकाम सुरू आहे. या दोन्ही ठिकाणी पर्यटक तसेच स्थानिकांना प्रतिबंध करण्यात आला आहे. तसा आदेश भोर विभागाचे उपविभागीय अधिकारी राजेंद्र कचरे यांनी स्थानिक तालुका प्रशासनाला दिला आहे.

शिवकालीन ठेवा येतोय उजेडात

पुरातत्व विभागाच्या वतीने गेल्या आठवड्यात 3 मार्च रोजी शिवापट्टण वाडा व महाराणी सईबाई साहेब समाधिस्थळाच्या उत्खनानास सुरुवात झाली. गुंजवणी नदीच्या तिरावरील सईबाई समाधिस्थळाच्या उत्खननात अद्यापि वस्तू अथवा बांधकामाचे अवशेष सापडले नाहीत. मात्र, शिवरायांचे वास्तव्य असलेल्या शिवापट्टण वाड्याच्या ठिकाणी खोदकाम करताना मोठा शिवकालीन ठेवा उजेडात येऊ लागला आहे. त्यामुळे खोदकाम करणारे मजूर, अधिकारीही आश्चर्यचकित होत आहेत. शिवापट्टण वाड्याचा मोठा विस्तार असल्याचे एका भागाच्या उत्खननातून पुढे आले आहे.

मूळ वाड्याच्या तटबंदीच्या भितींचे अवशेष ठिकठिकाणी आहेत. काही ठिकाणी मोठी झाडे वाढली आहेत. गवत, झुडपे काढून वाड्याच्या मूळ ठिकाणी खोदकाम करताना जमीनदोस्त झालेल्या भिंतीचे शिवकालीन शैलीतील बांधकाम, दगडी चिरेबंदी तसेच विटांचेही बांधकाम आहे. दर्जेदार व अतिशय उत्कृष्ट बांधकाम जमिनीत शेकडो वर्षे लुप्त होऊनही जसेच्या तसे आहे. पुरातत्व खात्याचे सहसंचालक विलास वाहणे यांच्या देखरेखीखाली मूळ ठिकाणचे संपूर्ण उत्खनन करून त्याच्या अवशेषाचे पुरातत्वतीय संशोधन केले जाणार आहे. त्यासाठी दोन महिन्यांचा कालावधी लागणार आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT