पुणे

Pimpri News : उत्सवाच्या धामधुमीत दहशतवादविरोधी कारवाई; पिंपरीतून तीन संशयितांना अटक

अमृता चौगुले

पिंपरी; पुढारी वृत्तसेवा : शहरात बाप्पांच्या आगमनाची धामधूम सुरू असताना दहशतवादविरोधी पथकाने छापा मारून संशयितांना अटक केल्याने एकच खळबळ उडाली. अटक करण्यात आलेले तिघेजण बांग्लादेशी असून, ते बनावट कागदपत्रांच्या आधारे भारतात वास्तव्य करीत असल्याचे समोर आले आहे. सोमवारी (दि. 18) दुपारी बोर्‍हाडेवाडी, मोशी येथे ही कारवाई करण्यात आली. सुकांथा सुधीर बागची (वय 21), नयन बिंदू बागची (वय 22), सम्राट बलाय बाला (22, तिघे मूळ रा. बहादूरपूर, पो. दतोकंदवा, जि. मदारीपूर, बांग्लादेश) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी दहशतवादविरोधी पथकाचे अधिकारी यांनी मंगळवारी (दि. 19) एमआयडीसी भोसरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र राज्याच्या दहशतवाद विरोधी पथकाच्या पुणे युनिटला माहिती मिळाली की, बोर्‍हाडेवाडी मोशी येथे एका बांधकाम साईटवर काहीजण बांग्लादेश येथून येऊन बेकायदेशीरपणे वास्तव्य करीत आहेत. त्यानुसार, दहशतवादविरोधी पथकाने बोर्‍हाडेवाडी येथील सह्याद्री नावाच्या बांधकाम साईटवरील लेबर कॅम्पमध्ये सोमवारी दुपारी साडेतीन वाजता छापा मारून तिघांना ताब्यात घेतले. आरोपींकडे भारतात वास्तव्य करण्याबाबत कोणतीही वैध कागदपत्रे नव्हती.

तसेच, तिघेही भारत-बांग्लादेश सीमेवरील मुलकी अधिकार्‍यांच्या लेखी परवानगीशिवाय घुसखोरीच्या मार्गाने भारतात आले असल्याचे चौकशी समोर आले आहे. आरोपी बोर्‍हाडेवाडी येथील सह्याद्री बांधकाम साईटवर मजुरी काम करीत होते. आरोपींकडून पोलिसांनी बांग्लादेशी चलन, तीन भारतीय आधारकार्ड, पॅनकार्ड, चार मोबाईल जप्त केले आहेत.

तपासाला मर्यादा ?

दहशतवादविरोधी पथकाने कारवाई केल्यानंतर पथकाकडून संबंधित गुन्ह्याचा तपास केला जातो. पाळेमुळे खोदून आरोपींचा हेतू शोधण्याचा प्रयत्न केला जातो. मात्र, बोर्‍हाडेवाडी, मोशी येथील गुन्ह्याचा तपास स्थानिक पोलिसांकडेच (एमआयडीसी भोसरी) देण्यात आला. त्यामुळे तपासाला मर्यादा आल्या.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT