PMC news : महापालिकेचे बजेट डिसेंबरमध्ये; लोकसभा आचारसंहितेच्या शक्यतेमुळे निर्णय

PMC news  : महापालिकेचे बजेट डिसेंबरमध्ये; लोकसभा आचारसंहितेच्या शक्यतेमुळे निर्णय

पुणे : लोकसभेच्या पंचवार्षिक निवडणुकीची आचारसंहिता फेब—ुवारीत लागण्याची दाट शक्यता असल्याने महापालिकेचे 2024-25 आर्थिक वर्षाचे अंदाजपत्रक डिसेंबरमध्ये सादर केले जाणार आहे. त्यामुळे प्रशासनाकडून अंदाजपत्रकाच्या तयारीसाठी लगबग सुरू झाली आहे. पालिकेच्या विविध विभागांकडून सुरू असलेली कामे व प्रस्तावित कामे व प्रकल्पांसाठी निधीची तरतूद करण्याचे प्रस्ताव वित्त व लेखा विभागाला सादर केले जातात. सर्व विभागांचे प्रस्ताव प्राप्त झाल्यानंतर वित्त व लेखा विभागाकडून प्रशासनाचे अंदाजपत्रक तयार केले जाते. हे अंदाजपत्रक महापालिका आयुक्त दरवर्षी जानेवारीमध्ये स्थायी समितीला सादर करतात.

त्यानंतर 31 मार्चपूर्वी स्थायी समिती व मुख्य सभा या अंदाजपत्रकास अंतिम मंजुरी देते व 1 एप्रिलपासून नवीन अंदाजपत्रकाची अंमलबजावणी सुरू होते. मात्र, गेल्या दीड वर्षापासून प्रशासक नियुक्त असल्याने आयुक्तच स्थायी समिती आणि मुख्य सभेस मान्यता देतात. लोकसभेच्या पंचवार्षिक निवडणुकीची आचारसंहिता फेब—ुवारीत लागण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने केंद्र सरकारने तयारी सुरू केली आहे.

या पार्श्वभूमीवर आचारसंहितेची प्रशासकीय अडचण नको म्हणून यंदा डिसेंबर अथवा जानेवारीच्या पहिल्या आठवड्यातच महापालिकेचे 2024-25 चे अंदाजपत्रक सादर केले जाणार असल्याचे आयुक्त विक्रम कुमार यांनी सांगितले. दरम्यान, गणेशोत्सव संपल्यानंतर अंदाजपत्रकासाठीच्या बैठका घेण्यात येणार आहेत. त्यासाठी सर्व विभागप्रमुखांना आतापासून चालू वर्षात झालेल्या खर्चाची तसेच 31 मार्चपर्यंत अपेक्षित खर्चाची माहिती तयार करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news