पुणे: राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद अर्थात विद्या प्राधिकरणाकडून शैक्षणिक वर्षाचे वेळापत्रक जाहीर केले आहे. विद्या प्राधिकरणाकडून जाहीर करण्यात आलेल्या वेळापत्रकानुसार इयत्ता दहावीच्या परीक्षा फेब्रुवारीच्या तिसर्या आठवड्यात सुरू होतील.
तर, पहिली ते नववीच्या परीक्षा एप्रिलच्या तिसर्या आठवड्यात होणार आहेत. यापूर्वी वेळापत्रक बदलल्याने गोंधळ झाला होता. त्यामुळे यंदा ’एससीईआरटी’ने सावध भूमिका घेतली आहे. परीक्षा वेळेवर होऊन विद्यार्थ्यांना फायदा होईल, अशी अपेक्षा ’एससीईआरटी’कडून व्यक्त करण्यात आली आहे.
गेल्या शैक्षणिक वर्षात इयत्ता पहिली ते नववीच्या परीक्षा आणि संकलित मूल्यमापन चाचणीचे वेळापत्रक आयत्या वेळी बदलल्यामुळे टीकेचे धनी ठरलेल्या एससीईआरटीने यंदा सावध भूमिका घेतली आहे. एससीईआरटीने जाहीर केलेल्या शैक्षणिक वेळापत्रकात पहिली ते दहावीच्या परीक्षांचा कालावधी आखून दिला आहे.
या वेळापत्रकानुसार राज्य माध्यमिक शालान्त मंडळाच्या म्हणजेच दहावीच्या परीक्षा फेब्रुवारीच्या तिसर्या आठवड्यात सुरू होणार आहेत. तर इयत्ता पहिली ते नववीच्या परीक्षा गेल्या वर्षाप्रमाणेच एप्रिलच्या तिसर्या आठवड्यात नियोजित करण्यात आल्या आहेत.
पहिली ते नववीच्या परीक्षांचे नियोजन करण्याचे अधिकार आत्तापर्यंत प्रत्येक शाळेतील मुख्याध्यापकांना होते. त्यामुळे वार्षिक परीक्षेचे नियोजनही मुख्याध्यापक आपापल्या शाळांच्या वेळापत्रकानुसार करीत होते. मात्र, यामुळे शैक्षणिक दिवस वाया जात असल्याचे कारण देत एससीईआरटीने गेल्या वर्षी आयत्या वेळी म्हणजेच मार्च महिन्यात राज्यातील सर्व शाळांच्या वार्षिक परीक्षा तसेच संकलित मूल्यमापन चाचणी म्हणजेच पॅटचे वेळापत्रक जाहीर केले. या वेळापत्रकानुसार या परीक्षा 25 एप्रिलपर्यंत नियोजित होत्या.