पुणे : पुढारी वृत्तसेवा
राजीव गांधी प्राणिसंग्रहालयात पुणेकरांना लवकरच झेब्रा, जिराफ हे परदेशी प्राणी पाहायला मिळणार आहेत. त्याची कार्यवाही सुरू झाली आहे. परंतु, प्राणिमित्रांनी झेब्रा, जिराफ यांचे आयुष्य कमी होत असल्याचे सांगत त्याला विरोध केला आहे. तर, सामान्य पुणेकरांनी आम्हाला हे प्राणी पाहण्याची संधी मिळू द्या, अशी भावना व्यक्त केली आहे.
काही दिवसांपूर्वी प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाने पुण्यातील राजीव गांधी प्राणिसंग्रहालयाला झेब्रा, जिराफ हे प्राणी आणण्यासाठी परवानगी दिली आहे. त्यानुसार प्राणिसंग्रहालय प्रशासनाने कार्यवाही सुरू केली असून, कात्रज बागेत या प्राण्यांसाठी खंदक बनविण्याचे कामही सुरू करण्यात आले आहे. सध्या या ठिकाणी फक्त झेब्रा आणण्याचे प्रशासनाचे नियोजन झाले असून, जिराफ आणण्यासाठी आणखी बराच कालावधी लागणार आहे. याची चुणूक लागताच प्राणिमित्रांनी प्रसिध्दीसाठी स्टंटबाजी केल्याचा आरोप प्राणिसंग्रहालय प्रशासनाकडून करण्यात आला आहे.
पुणे शहरात सर्वसामान्यांसह अनेक उच्चभ्रू लोक राहतात. अनेकांचा दिनक्रम सकाळी उठले की रात्र होईपर्यंत काम करण्यातच जातो. मग आठवड्याची एक सुटी मिळाली की, एखाद्या रविवारी आजूबाजूच्या पर्यटनस्थळी फिरायला जाऊन आठवड्याचा शीण घालवून मन प्रसन्न होते. त्यातच एखाद्या लांबच्या वन्यजीव पर्यटनस्थळी (उदा. गीर अभयारण्य व अन्य ठिकाणी) पुण्यातून जाणे सामान्य नागरिकांना परवडणारे नाही. त्यामुळे पुणेकर नागरिक 'आम्हाला झेब्रा, जिराफ पाहू द्या' त्याला विरोध करू नका, अशा भावना व्यक्त करीत आहेत.
मात्र, या प्राण्यांना परदेशातून पुण्यात आणले तर वातावरण बदल, बागेतील अपुरी जागा, यामुळे त्यांचे 25 वर्षांचे असलेले आयुर्मान कमी होणार आहे. तर, पालिकेच्या तिजोरीतील सुमारे एक ते दीड कोटी रुपये खर्च होणार असल्यामुळे हे प्राणी आणू नका, असे सांगत प्राणिमित्रांनी याला विरोध केला आहे.
पालिका प्रशासन वर्षभरात नको तिथे खड्डे खणून, रस्ते उकरून, पादचारी मार्ग उखडून पुन्हा बनवून, उड्डाणपूल तोडून पुन्हा बनवून, बीआरटी मार्ग तोडून पुन्हा बनवून आमच्याच कोट्यवधींचा चुराडा करीत आहे. त्यामुळे कधीतरी आमच्यासाठी पैसे खर्च होत असतील, तर त्याला विरोध करणे चुकीचे आहे. इतर वेळी खर्चाची उधळपट्टी केली जाते. त्याकडे लक्ष देऊन आवाज उठवावा. – दीपक सोनावणे, पुणेकर नागरिक
आमच्यासारख्या सर्वसामान्यांना आठवड्यातून वेळ मिळाला की कात्रजच्या बागेत जाऊन प्रत्यक्षपणे प्राणी पाहण्याची संधी मिळते. तेही 20 ते 40 रुपयांच्या तिकिटामध्ये. येथील प्राणिसंग्रहालय नसते तर आम्हाला प्रत्यक्षपणे प्राणी पाहायला परराज्यातील लांबच्या ठिकाणी असलेल्या अभयारण्यात जाणे परवडले असते का? त्यामुळे याला विरोध करणे, चुकीचे आहे. – शरद पांडव, पुणेकर नागरिक
कात्रज प्राणिसंग्रहालय अद्ययावत करण्यासाठी असलेल्या निधीतून आम्ही झेब्रा आणि जिराफ हे प्राणी कात्रज येथील राजीव गांधी प्राणिसंग्रहालयात आणणार आहे. खंदकाचे काम लवकरच सुरू करण्यात येणार असून, किमान झेब्रा, जिराफ पुण्यात आणण्यासाठी वर्षभराचा कालावधी लागणार आहे. तसेच, आम्हाला कोणत्याही प्राणिमित्रांची लेखी तक्रार असलेले पत्र मिळालेले नाही.
– अशोक घोरपडे, मुख्य उद्यान अधीक्षक, पुणे मनपा
प्राणिसंग्रहालय ही संकल्पना आता कालबाह्य (आउटडेटेड) झाली आहे. त्यात काळानुसार बदल होणे गरजेचे आहे. झेब्रा, जिराफ या प्राण्यांची आयात करून प्राणिसंग्रहालय प्रशासन पैसे वाया घालवत आहे. आता बांधकामासाठी दीड कोटी आणि नंतर पुन्हा त्यांना सांभाळायचा वेगळा खर्च लागणार आहे. त्याबरोबरच येथील वातावरणाचा त्यांच्यावर परिणाम होणार असून, त्यांचे आयुर्मानसुध्दा कमी होणार आहे. हे प्राणी आयात करून खर्च वाढविण्याऐवजी हा निधी संग्रहालयाच्या अंतर्गत बांधकामासाठी वापरावा. – डॉ. सुषमा दाते, प्राणिमित्र