पौड: मुळशी तालुक्यातील लोकप्रिय पर्यटनस्थळे असलेले अंधारबन व कुंडलिका व्हॅली येत्या शनिवार (दि. 9) पासून मर्यादित संख्येसह पर्यटकांसाठी पुन्हा खुली होणार आहे. मात्र यासाठी ऑनलाइन पूर्वनोंदणी अनिवार्य करण्यात आली असून, नोंदणीशिवाय कोणालाही प्रवेश दिला जाणार नाही.
या पर्यटनस्थळांवरील अनियंत्रित गर्दीमुळे दि. 3 जुलैपासून प्रवेश बंद करण्यात आला होता. या कालावधीत वन विभागाने सुरक्षितता उपाययोजनांची पाहणी करून पर्यटकांची संख्या नियंत्रित ठेवण्यासाठी नवीन नियमावली लागू केली आहे. आता पुन्हा दोन्ही ठिकाणे सुरू होणार असल्याने पर्यटकांत उत्साहाचे वातावरण आहे. (Latest Pune News)
नोंदणी प्रक्रिया
शुक्रवार, दि. 8 ऑगस्ट रोजी सकाळी 10 वाजल्यापासून andharban. org या संकेतस्थळावर नोंदणी सुरू होईल. इच्छुक पर्यटकांनी पसंतीचा दिवस निवडून आधारकार्ड/पॅनकार्ड यांपैकी एक वैध ओळखपत्र अपलोड करावे आणि ऑनलाइन पेमेंट पूर्ण करावे. नोंदणी पूर्ण झाल्यानंतर टठ कोडसह पावती ई-मेल व व्हॉट्सअॅपवर मिळेल. ती पावती प्रवेशद्वारावर दाखवल्यास प्रवेश दिला जाईल.
केवळ बुकिंग असलेल्यांनाच प्रवेश
अंधारबन व कुंडलिका व्हॅली ही पर्यटनस्थळे सुधागड अभयारण्यात येतात. दररोज अंधारबनसाठी 700 व कुंडलिकासाठी 1000 पर्यटकांचीच मर्यादा ठेवण्यात आली आहे. बुकिंगशिवाय प्रवेश दिला जाणार नाही.
गाईडची सेवा बंधनकारक
अचानक हवामान बदल, दाट जंगलातील धोके आणि सुरक्षिततेसाठी नोंदणीकृत स्थानिक गाईडची सेवा घेणे अनिवार्य करण्यात आले आहे. हे गाईड अनुभवसंपन्न असून, ते संकटप्रसंगी मदत करू शकतात.
प्लास्टिक वस्तूंवर बंदी
प्लास्टिकच्या बाटल्या, युज-अँड-थ्रो वस्तू आणण्यास सक्त मनाई आहे. पर्यावरण रक्षणासाठी ही कारवाई करण्यात आली असून, त्यासाठी दर व्यक्तीमागे 50 रुपये डिपॉझिट घेण्यात येईल. ट्रेकनंतर प्लास्टिक वस्तू परत केल्यास रक्कम परत केली जाईल.
वेळेचे पालन आवश्यक
पर्यटकांना पहाटे 6 ते सकाळी 11.30 या वेळेतच प्रवेश दिला जाईल. 11.30 नंतर येणार्यांना प्रवेश नाकारण्यात येईल. सर्व पर्यटकांनी दुपारी 4.30 वाजेपर्यंत अभयारण्यातून बाहेर पडणे बंधनकारक आहे. दर सोमवारी पर्यटनस्थळे पूर्णपणे बंद असतील.
पर्यटनस्थळांवर फक्त ऑनलाइन बुकिंग केलेल्यांनाच प्रवेश देण्यात येईल. प्लास्टिक वस्तूंवर बंदी असून, सर्वांनी पर्यावरणाच्या रक्षणात सहकार्य करावे. दुपारी 4.30 वाजेपूर्वी बाहेर पडणे अनिवार्य आहे.- मनोहर दिवेकर, सहायक वनसंरक्षक