

काटेवाडी: काटेवाडी (ता. बारामती) येथील पोस्ट ऑफिसमधील सुविधा गेली चार दिवसांपासून बंद असल्याने ग्रामस्थांची गैरसोय होत आहे. सॉफ्टवेअर प्रणालीमध्ये बदल केले जाणार असल्याच्या नावाखाली पोस्टाच्या सुविधा गेल्या आठवड्यापासून बंद आहे. त्यामुळे काटेवाडी, कन्हेरी, पिंपळी, लिमटेक, सोनगाव परिसरातील नागरिकांची गैरसोय होत आहे. ही सुविधा पूर्ववत व्हायला किमान दोन ते चार दिवसाचा वेळ लागू शकतो, असे सांगण्यात आले.
सध्या पोस्टामध्ये पीएम किसान, लाडकी बहिण योजने सह इतर योजनांचे लाभ थेट दिले जात आहेत. सर्व्हर बंद असल्यामुळे पीएम किसान योजनेचे लाभधारक हेलपाटे मारून त्रस्त झाले आहेत. रक्षाबंधन सणाच्या पार्श्वभूमीवर पोस्टाने राख्या पाठवल्या जातात. त्यामुळे राखी वेळेवर मिळणार का असा प्रश्न बहिणींना पडला आहे. (Latest Pune News)
सोमवारपासून पत्र वाटप सुविधा सुरू झाली आहे. ऑनलाईन सुविधा सॉफ्टवेअर प्रणालीत बदलामुळे अनेक योजनांची कामे प्रलंबित आहेत. पोस्टाच्या सेवा सुविधा कार्यान्वित कधी होणार, असा सवाल ग्रामस्थ करीत आहेत. पोस्ट खात्यांमध्ये पैसे भरता येत नाही किंवा काढता देखील येत नसल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत.
टपाल कार्यालयात सुसूत्रता निर्माण करण्यासाठी अत्याधुनिक एपीटी 2.0 (प्रगत टपाल तंत्रज्ञान) सॉफ्टवेअर कार्यान्वित केले जाणार असल्याने सेवा बंद आहेत. बारामती विभागाअंतर्गत टपाल विभागाकडून एटीपी 2.0 सॉफ्टवेअरची अंमलबजावणी केली जाणार आहे. अधिक वेगवान आणि उत्तम सेवा देण्याच्या उद्देशाने ही प्रणाली कार्यान्वित केली जाणार आहे. याबाबत संबंधित कार्यालयात संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकला नाही.