पुणे

…अन् जुळल्या द़ृष्टिहीनांच्या रेशीमगाठी..!

Laxman Dhenge

पुणे : पुढारी वृत्तसेवा : सनई – चौघडे आणि बँडच्या तालावर नाचणारी व-हाडी मंडळी… विवाह सोहळ्याची तयारी… अक्षता वाटण्याची लगबग… देवघरापासून ते स्वयंपाकघरातील भांडी आणि संसारासाठी आवश्यक वस्तूंनी सजलेले रुखवत आणि अक्षतांच्या माध्यमातून शुभ आशीर्वाद देण्यासाठी जमलेले वधू -वरांचे द़ृष्टिहीन मित्र -मैत्रिणी आणि विविध क्षेत्रांतील व्यक्ती… अशा आनंदी वातावरणात द़ृष्टिहीन वधू -वरांचा विवाह सोहळा रविवारी संपन्न झाला. आनंदाने द़ृष्टिहीन जोडपी विवाह बंधनात अडकले अन् डोळ्याने दिसत नसूनही उपस्थितांचे प्रेम आणि आपुलकीने त्यांचे डोळे पाणावले.

निमित्त होते शुक्रवार पेठेतील सेवा मित्रमंडळ ट्रस्ट व लुई ब्रेल अंध-अपंग कल्याण संस्थेतर्फे आर्थिकदृष्टया दुर्बल असलेल्या दोन द़ृष्टिहीन तरुण – तरुणींच्या अनोख्या विवाह सोहळ्याचे. या वेळी खासदार डॉ. मेधा कुलकर्णी, माधुरी मिसाळ, युवा उद्योजक पुनीत बालन, मंडळाचे शिरीष मोहिते, सचिन ससाणे, अमर लांडे, विक्रांत मोहिते, उमेश कांबळे आदी उपस्थित होते. लुई ब्रेल अंध-अपंग संस्थेतील हे तरुण – तरुणी आहेत. रायगडच्या गणेश मौर्य याचा विवाह सांगलीच्या स्वाती चव्हाण हिच्याशी झाला. तर नगरच्या वैभव ढवळे याचा विवाह पुण्याच्या प्रीती अग्रवाल हिच्याशी झाला.

सेवा मित्रमंडळ आणि इतर गणेशोत्सव मंडळांनी पुढाकार घेऊन लुई ब्रेल संस्थेसोबत या विवाह सोहळ्याची तयारी सुरू केली. गणेशोत्सव मंडळातील पदाधिकार्‍यांनी आणि कार्यकर्त्यांनी या मुलींचे मामा म्हणून कन्यादान केले. मेहेंदी, साखरपुडा, हळदी समारंभ अशा सगळ्या कार्यक्रमात आजूबाजूच्या परिसरातील महिलांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला. मयूर ब्रास बँड वरातीमध्ये सहभागी झाले होते. गणेशोत्सव मंडळे, विविध संस्था आणि सामान्य नागरिकांनी दिलेल्या मदतीतून हा विवाह सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT