Ancient Temple in Maharashtra Restoration
शिवाजी शिंदे
पुणे: राज्यातील 500 वर्षांहून जुन्या आणि जीर्ण झालेल्या प्राचीन मंदिरांच्या जीर्णोद्धाराची महत्त्वाकांक्षी योजना संथगतीने सुरू असल्याचे चित्र आहे. दोन वर्षांहून अधिक काळ लोटला तरी, नऊ प्रमुख मंदिरांपैकी केवळ रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर येथील धूतपापेश्वर मंदिराचेच काम पूर्ण झाले आहे. उर्वरित आठ मंदिरांची कामे विविध टप्प्यांवर असून, ती पूर्ण होण्यासाठी डिसेंबर 2026 पर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे. (Pune Latest News)
राज्यातील पाचशेहून अधिक वर्षांपासूनच्या जुन्या आणि जीर्ण झालेल्या प्राचीन मंदिरांचा कायापालट करण्याचा निर्णय राज्य शासनाने तीन वर्षापूर्वी घेतला होता.हे काम करण्यासाची जबाबदारी शासनाने महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ या विभागावर सोपविण्यात आली होती. त्यानुसार या महामंडळाने सर्व सोपस्कार पार पाडले आणि निविदा काढल्या. त्या सुमारे 125 कोटी रूपयांचा आहेत. पहिल्या टप्प्यात राज्यातील नऊपैकी तीन मंदिरांच्या जीर्णोद्धारासाठी राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) 71 कोटी रुपयांच्या पाच निविदा काढल्या होत्या.
त्यामध्ये पुणे जिल्ह्यातील कार्ला येथील एकवीरा देवी, बीडमधील पुरुषोत्तमपुरी तसेच कोल्हापूर जिल्ह्यातील कोपेश्वर मंदिराच्या कामांचा समावेश आहे. त्यानंतर हळहळू इतर मंदिराचे कायापालट करण्याचे काम सुरू करण्यात आले. ही मंदिरे ऐतिहासिक वारसा असल्याने त्यांच्या मूळ रचनेला धक्का न लावता अत्यंत काळजीपूर्वक काम करावे लागत आहे. छत, संरक्षक भिंती आणि इतर भागांची पडझड झाली असून, त्यांची दुरुस्ती करताना मूळ स्थापत्यशैली जपण्याचे मोठे आव्हान आहे.
धुतपापेश्वर मंदिराच्या सभोवतालचा परिसर अतिशय रम्य असून मंदिरही प्राचीन आहे. प्रशस्त असा सभामंडप, अंतर्गृह, गर्भगृह अशी रचना असलेल्या या मंदिरात येताक्षणी मन प्रसन्न होते. प्रवेशद्वारावर नगारखाना व आवारात दीपमाळा आहेत. मंदिराशेजारी काळ्या कातळावरून खाली झोकून देणारा मृडानी नदीचा प्रवाह आहे. कोसळणार्या पाण्याचा एक नितांत सुंदर धबधबा होतो. धबधब्याची खरी शोभा ऐन पावसाळ्यात दिसते. वरून खाली पाणी जेथे कोसळते तेथे एक डोह बनला आहे. त्याला कोटितीर्थ म्हणतात.