

पुणे : राज्यात यंदा आर्टिफिशिअल इंटेलिजन्स अर्थात एआय अभ्यासक्रमाच्या जागांमध्ये तब्बल 34 टक्के वाढ झाली आहे. संबंधित अभ्यासक्रमाच्या यंदा 12 हजार 660 वरून 16 हजार 995 जागा झाल्या आहेत. त्यामुळे राज्यात यंदा कॉम्प्युटर इंजिनिअरिंगच्या 4 हजार 500 जागांची वाढ झाली आहे. त्यातून अभियांत्रिकी महाविद्यालयांचा कॉम्प्युटर आणि तत्सम अभ्यासक्रम सुरू करण्याकडे अधिकाधिक कल दिसून येत आहे. दरम्यान अभियांत्रिकीच्या जागांमध्ये यंदा मोठी वाढ झाली असून, गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा 18 हजार 871 ने वाढ होऊन प्रवेशासाठी एकूण 1 लाख 76 हजार 95 जागा उपलब्ध होणार आहेत. (Latest Pune News)
गेल्या वर्षी अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी 1 लाख 57 हजार 224 जागा उपलब्ध होत्या. विद्यार्थ्यांचा वाढता कल पाहून महाविद्यालयांनी यंदा सर्वाधिक जागा कॉम्प्युटर शाखेच्या संबंधित अभ्यासक्रमांच्या वाढविल्या आहेत. त्यामध्ये आयटी, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, कॉम्प्युटर इंजिनीअरिंग आणि संबंधित अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी यंदा एकूण 91 हजार 525 जागा उपलब्ध असतील. गेल्या वर्षी याच अभ्यासक्रमांना 77 हजार 626 जागा होत्या.
मागील काही वर्षांत तंत्रज्ञानात मोठे बदल झाले असून, आर्टिफिशियल इंटेलिजिन्स क्षेत्रात करिअरच्या नवनवीन संधी निर्माण होत आहेत. त्याच धर्तीवर विद्यार्थ्यांचाही या शाखेकडे कल वाढला आहे. परंतु असे असले तरी गेल्या काही वर्षांत विद्यार्थ्यांचा कल घटलेल्या मेकॅनिकल, सिव्हिल आणि इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंग संबंधित जागांमध्येही यंदा वाढ झाल्याचे दिसून येत आहे. त्यातून इंजिनीअरिंगच्या प्रमुख शाखा असलेल्या या अभ्यासक्रमांनाही विद्यार्थी प्रवेश घेतील, अशी संस्था चालकांना आशा आहे.