भारत हा सध्या सर्वाधिक लोकसंख्येचा देश बनला आहे. File Photo
पुणे

जागतिक लोकसंख्या दिन विशेष : देशाच्या लोकसंख्येत तब्बल 105 कोटींची भर!

पुढारी वृत्तसेवा

भारत स्वतंत्र झाला तेव्हा देशाची लोकसंख्या ३० ते ३५ कोटींच्या जवळपास होती. १९५५ मध्ये ही लोकसंख्या ३९ कोटी ८५ लाखांवर गेली. १९५५ ते २०२४ या ६९ वर्षात देशाची लोकसंख्या ३८ कोटींवरून तब्बल १४४ कोटींवर पोहोचली. म्हणजे १०५ कोटींची भर देशाच्या लोकसंख्येत पडली. याचे प्रमुख कारण म्हणजे भारतातील लोकांचे सरासरी आयुर्मान ७२.०३% इतके वाढले. मात्र, बालमृत्युदर हा खूप मोठा आहे.

म्हणजे दर हजारी २४.५ टक्के आहे. त्यामुळे २०५० पर्यंत भारताची लोकसंख्या १७७ कोटींपर्यंत जाईल. मात्र, २०६२ नंतर लोकसंख्या वाढीचा दर कमी होण्यास प्रारंभ होईल, असा अंदाज भारतासह जगातील तज्ज्ञांनी काढला आहे.

जगभरात दरवर्षी ११ जुलै हा दिवस जागतिक लोकसंख्या दिन म्हणून साजरा केला जातो. यानिमित्ताने लोकसंख्यावाढीमुळे निर्माण होणाऱ्या समस्यांकडे लक्ष वेधले जाते आणि त्यावर विचारमंथन केले जाते. जुलै २०२४ मध्ये भारताची एकूण लोकसंख्या १४४ कोटी १७ लाख ९८२ इतकी झाली आहे.

आज जागतिक लोकसंख्या दिन भाग-१ आपण २०२३ मध्येच चीन या जगातील सर्वाधिक लोकसंख्येच्या देशाला मागे टाकत जगात नंबर वन झालो आहोत. आपल्या देशात दोन हजारांपेक्षा जास्त जाती-प्रजाती, पोटजाती, सहा धर्म आणि १२२ प्रकारच्या बोलीभाषा बोलणारे लोक राहतात.

इतकी प्रचंड विविधता असणारा भारत हा जगातला एकमेव देश आहे. एवढी मोठी लोकसंख्या असूनही भारताची आर्थिक स्थिती, जीवनस्तर, खाद्यपदार्थांची निर्मिती याबाबतीत चांगली सुधारणा झाली असल्याचे मत जागतिक बँकेने व्यक्त केले आहे. असे असले तरी भारतातील जीवनमान आणखी सुधारायला हवे. यात शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रात आणखी खूप मोठ्या सुधारणा करण्याची आवश्यकता असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. भारतातील श्रमशक्तीचा वापर आपण आगामी ३० वर्षात केला नाही, तर जगातली तिसरी मोठी अर्थव्यवस्था होण्याला काही अर्थ राहणार नाही, असेही अर्थतज्ज्ञांचे मत आहे. कारण आपल्या देशातील श्रमशक्ती पूर्णपणे वापरली जात नाही.

जगाच्या तुलनेत सरासरी तरुणांचे वय हे भारतात सर्वात चांगले म्हणजे २८ वर्षे इतके आहे, तर युरोपासह जगात ते ४८ ते ५० आहे. त्यामुळे आगामी ३० ते ४० वर्षे भारत लोकसंख्येच्या बाबतीत जगात अग्रेसर राहील. तसेच, २०५० पर्यंत भारताची लोकसंख्या १७७ कोटी इतकी होईल, असा अंदाज आहे. २०६२ नंतर मात्र भारताच्या लोकसंख्येत घट होण्यास हळुवारपणे सुरुवात होईल, असा जगभरातील तज्ज्ञांनी अंदाज काढला आहे. (स्रोत : जागतिक बँक अहवाल, वल्डोमीटर, संयुक्त राष्ट्र, आर्थिक सामाजिक अहवाल विभाग)

लोकसंख्यावाढ हे आता गरिबीचे कारण होऊ शकत नाही. कारण आपल्या देशात जगाच्या तुलनेत श्रमशक्ती खूप मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. त्याचा आपण लाभ घेतला पाहिजे. केवळ जगातील तिसरी आर्थिक महासत्ता होईल, आशा घोषणा न करता सरकारने शिक्षण व आरोग्य या दोन क्षेत्रांत मोठी गुंतवणूक केली पाहिजे, तरच भारतीय लोकांचे राहणीमान सुधारेल. तसेच, विकासदर हा प्रभावी ठरेल. लोकांच्या हाताला भरपूर काम मिळाले, तरच देशाचा मानव विकासदर उंचावेल. जगाच्या तुलनेत भारताचा मानव विकास निर्देशांक १३४ आहे. त्यामुळे मानव विकासदरावर आपल्याला भरपूर काम करणे आवश्यक आहे. सार्वजनिक क्षेत्र पूर्ण कोलमडून पडले आहे. त्यावर काम करावे लागेल. जर बांगलादेशासारखा देश संपूर्ण जगाला कपडे पुरवत असेल, तर भारत का करू शकत नाही? व्हिएतनामसारखा छोटा देश आपल्यापेक्षाही चांगली प्रगती करू शकतो. याचा विचार भारताने करावा, तसे आर्थिक नियोजन करायला हवे. अन्यथा पुढील ३०-३५ वर्षे आपण काम केले नाही, तर भारत जगातील तिसरी महासत्ता होण्यापासून कोसो दूर राहू शकतो.
प्रा. एच. एम. देसरडा, ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ, छत्रपती संभाजीनगर

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT