Maratha Reservation : मराठा आरक्षण प्रश्नावरून सत्ताधारी-विरोधक भिडले!

विधान परिषदेत मार्शलना बोलावण्याची नामुष्की
Maratha Reservation
मराठा आरक्षणावर सर्वपक्षीय बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.File Photo

मुंबई : मराठा आणि ओबीसी आरक्षणावर तोडगा काढण्यासाठी राज्य सरकारने मंगळवारी बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीवर विरोधी पक्षांनी टाकलेल्या बहिष्काराचे संतप्त पडसाद विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांत बुधवारी उमटले. विधान परिषदेत सत्ताधारी आणि विरोधी सदस्य एकमेकांना भिडल्याने मार्शलना बोलावण्याची वेळ आली. सत्ताधारी आणि विरोधकांनी या प्रश्नावर केलेले आरोप-प्रत्यारोप आणि प्रचंड गोंधळामुळे दोन्ही सभागृहांचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब करावे लागले.

Maratha Reservation
Maratha Reservation : शंभुराज देसाई आमचा प्रश्न निकालात काढतील : मनोज जरांगे

सर्वपक्षीय बैठकीवरील बहिष्कारामुळे आरक्षणाबद्दल विरोधकांचे पुतना मावशीचे प्रेम दिसून आले, अशा शब्दांत भाजपचे गटनेते प्रवीण दरेकर यांनी विरोधकांना लक्ष्य करताच विधान परिषदेत गोंधळ उडाला. विरोधक आणि सत्ताधारी बाकावरील आमदार वेलमध्ये जात एकमेकांना भिडले. परिस्थिती इतकी विकोपाला गेली की, उपसभापती डॉ. नीलम गोर्‍हे यांनी शेवटी मार्शलना पाचारण केले. या गोंधळातच उपसभापतींनी सभागृहाचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब केले.

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर समन्वयाने तोडगा काढण्यासाठी राज्य सरकारने मंगळवारी, 9 जुलै रोजी संध्याकाळी सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. मात्र, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी आरक्षणाच्या प्रश्नावर आंदोलकांची भेट घेऊन काय चर्चा केली, हे राज्यातील जनतेला कळले पाहिजे. त्यासाठी त्यांनी सभागृहात भूमिका मांडावी, अशी भूमिका महाविकास आघाडीच्या नेत्यांनी घेतली. राज्य सरकारने विरोधकांना विश्वासात घेतले नाही, असा आरोप करत महाविकास आघाडीने या सर्वपक्षीय बैठकीवर बहिष्कार टाकला होता.

Maratha Reservation
Maratha Reservation : सगेसोयऱ्यांच्या अंमलबजावणीसाठी मुंबईत धडक मारणार : जरांगे

बुधवारी विधान परिषदेत भाजपचे गटनेते प्रवीण दरेकर यांनी यासंदर्भात औचित्याचा मुद्दा उपस्थित केला. महाराष्ट्रात मराठा आरक्षणाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्यामुळे गावागावांत जातीय सलोखा बिघडून मोठ्या प्रमाणात तेढ निर्माण झाली आहे. अशावेळी सर्व पक्षांच्या नेत्यांनी राज्य सरकारने पुढाकार घेऊन मार्ग काढावा, अशी भूमिका घेतली होती. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही पुढाकार घेत सर्व पक्षांच्या प्रमुखांची बैठक सह्याद्री अतिथीगृहात बोलावली होती. परंतु, आरक्षणाच्या बाबतीत काहींच्या मनातील पुतणा मावशीचे प्रेम होते ते समोर आले. या बैठकीला शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी येणे अपेक्षित होते, असे दरेकर म्हणाले.

विरोधी सदस्यांचा आक्षेप

दरेकरांच्या वक्तव्याला विरोधी बाकावरील आमदारांनी आक्षेप घेत सरकारच्या विरोधात घोषणाबाजी सुरू केली. सत्ताधारी आमदारांनीही प्रत्युत्तर देणे सुरू केले. विरोधक आणि सत्ताधारी पक्षाचे आमदार वेलमध्ये एकमेकांसमोर येऊन घोषणा देऊ लागले. हा गोंधळ एवढा शिगेला पोहोचला की, सर्वांना जागेवर बसण्याच्या सूचना देतानाच एक फुटाचे अंतर ठेवा, असे आवाहन उपसभापती गोर्‍हे यांनी केले. परंतु, कोणीही ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हते. शेवटी उपसभापती डॉ. गोर्‍हे यांनी मार्शलला बोलावण्याचे निर्देश दिले. या गोंधळात विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांना बोलण्याची संधी दिली; पण गोंधळामुळे त्यांना बोलताच आले नाही. या गोंधळातच उपसभापतींनी पुरवणी मागण्या मंजूर करत सभागृहाचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब केले.

सरकारने पळ काढला : दानवे

आरक्षणाच्या मुद्द्यावर कोणतीही चर्चा न करता सभागृहाचे कामकाज तहकूब केल्याप्रकरणी विरोधकांनी विधिमंडळाच्या पायर्‍यांवर घोषणा देत सरकारचा निषेध केला. सरकारने दोन्ही घटकांशी चर्चा करायला हवी होती. मराठा आरक्षणासंदर्भात कोणतीही माहिती विरोधी पक्षाला सरकारने दिली नाही. नवी मुंबईत मराठा समाज आला होता, त्यावेळी मुख्यमंत्री एकटे का गेले, असा सवाल करत अडचणीचा विषय येताच सरकारने सर्वपक्षीय बैठक बोलावली. एकप्रकारे स्वतःची कातडी वाचविण्यासाठी मराठा आरक्षणावर चर्चा न करता विधान परिषदेत सत्ताधारी आणि उपसभापती यांनी संगनमताने दिवसभराचे कामकाज तहकूब केल्याचा आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news