Amit Shah on Ajit Pawar : मी अजितदादांना विचारले होते की, तुम्हाला महाराष्ट्रातील महायुती सरकारमध्ये का सहभागी व्हावे असे वाटते? त्यावेळी अजितदादांनी सांगितले की, महाराष्ट्राचा विकास करण्यासाठी महायुतीमध्ये सहभागी होणार असल्याचे सांगितले होते. केवळ राज्याच्या विकासासाठी ते महायुती सरकारमध्ये सहभागी झाले होते, असे स्पष्ट करत काम करणारा माणूस वेळेच्या आधी गेला याचं दुःख आहे; पण जे काम केलं आणि ज्या पद्धतीने केलं ते महाराष्ट्रातील युवकांसाठी विद्यापीठ ठरेल, असा विश्वास केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज (दि. १५) व्यक्त केला. दिवंगत अजित पवार यांच्या पुणे जिल्हा परिषदेतील पुतळ्याच्या अनावरण प्रसंगी ते बोलत होते.
यावेळी अमित शहा म्हणाले की, "अजित पवार यांच्या अचानक जाण्याने निर्माण झालेली पोकळी कोणीच भरून काढू शकत नाही. त्यांचे आकस्मिक निधन माझ्यासाठी मोठा धक्का होता. मी नेहमीच कायम त्यांच्या चेहऱ्यावर हसू पाहिले होते. आजही डोळे बंद केले तरी ते समोर आहेत असं वाटतंय."
अजित पवारांनी आपल्या राजकीय कार्याची सुरुवात बारामतीमधून केली. बारामतीमधून सुरुवात करून ते सर्वोच्च स्थानावर पोहोचले. त्यांनी मला जेवढे फोन केले त्यातील बहुतांश फोन हे पुणे, बारामती आणि पिंपरी-चिंचवडच्या विकास कामांसाठी केले होते, असेही अमित शहा म्हणाले.
कोरोना काळात अजित पवार हे राज्यात मंत्री होते. त्या वेळच्या मुख्यमंत्र्यांचा संपर्क होत नव्हता; पण अजितदादा सकाळी सात वाजता मंत्रालयात फोनवर बोलायचे. कोरोना काळात त्यांनी महाराष्ट्राची काळजी घेतली, असेही अमित शहा यांनी सांगितले.