

कर्नाल (हरियाणा); वृत्तसंस्था : लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना खुल्या चर्चेचे दिलेले आव्हान स्वीकारत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी राहुल गांधींना प्रति-आव्हान दिले आहे. रस्त्यांवर राजकीय नौटंकी करण्याऐवजी संसदेत येऊन नियम आणि तथ्यांच्या आधारे समोरासमोर चर्चा करा, असे थेट उत्तर अमित शहा यांनी दिले आहे.
भाजपच्या 'लोकतंत्र बचाव, अराजकता हटाओ'मोहिमेअंतर्गत हरियाणामधील कर्नाल येथे आयोजित भव्य पदयात्रा आणि जाहीर सभेला संबोधित करताना शहा यांनी हे आव्हान दिले. शहा म्हणाले, राहुल गांधी जर तुम्हाला खरोखरच जबाबदार चर्चा करायची असेल, तुमच्या मुद्द्यांमध्ये सत्य, तर्क आणि तथ्य असतील, तर संसदेच्या पटलावर या. आपण समोरासमोर चर्चा करूयात! पण तुम्ही तिथून नेहमीप्रमाणे पळून जाल, कारण तुम्हाला उत्तरांचा सामना करता येणार नाही. राहुल गांधींनी पंतप्रधान मोदींना दिलेल्या आव्हानावर बोलताना शहा म्हणाले, "पंतप्रधान मोदींशी चर्चा करण्यासाठी तुम्हाला केवळ जाहीर सभांमध्ये बोलण्याची गरज नाही. राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींना औपचारिक पत्र लिहावे. जर काँग्रेसने घटनात्मक प्रक्रियेनुसार मागणी केली, तर आम्ही या विषयावर चर्चा करण्यासाठी संसदेचे विशेष अधिवेशन बोलवायलाही तयार आहोत."
एसआयआरवरून निशाणा
विरोधकांकडून 'मतचोरी' आणि मतदार याद्यांच्या विशेष संक्षिप्त पुनरीक्षणावर (एसआयआर) होत असलेले आरोप फेटाळत शहा म्हणाले की, काँग्रेसने २०१४, २०१९ आणि २०२४ च्या निवडणुका गमावल्या तेव्हा एसआयआर प्रक्रिया नव्हती. स्वतःच्या पराभवाचे खापर घटनात्मक संस्थांवर फोडणे ही काँग्रेसची सवय झाली आहे. मी डंके ही चोट सांगतो, की आपल्या देशातून घुसखोरांना बाहेर काढणारच, हा सरकारचा निर्धार आहे.
राहुल गांधींची अवस्था वारंवार नापास होणाऱ्या विद्यार्थ्यासारखी : मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ
गाझियाबाद : निवडणुकीत विजय मिळाल्यावर त्याचे श्रेय स्वतःकडे घेणारे राहुल गांधी पराभव झाल्यानंतर ईव्हीएमला दोष देतात. त्यांची अवस्था वारंवार नापास होणाऱ्या विद्यार्थ्यासारखी झाली आहे, अशी टीका उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी गुरुवारी केली.गाझियाबादमध्ये भाजपच्या ‘लोकशाही वाचवा, अराजकता हटवा’ पदयात्रेदरम्यान आयोजित सभेत ते बोलत होते. काँग्रेसने १९७५ मध्ये देशात आणीबाणी लागू केली होती. त्यामुळे आज त्याच पक्षाने लोकशाहीच्या रक्षणाबाबत बोलणे हा विरोधाभास असल्याचे योगी म्हणाले. काँग्रेसच्या सत्ताकाळात टू -जी आणि कोळसा घोटाळे झाल्याचा आरोपही त्यांनी केला. समाजवादी पक्षाच्या सरकारच्या काळात उत्तर प्रदेशात अनेक ठिकाणी दंगली झाल्याचा दावा करत त्यांनी सपावरही निशाणा साधला.