Amit Gorkhe MPSC Student Protest Pudhari
पुणे

Amit Gorkhe MPSC Students: एमपीएससी विद्यार्थ्यांच्या लढ्याला आमदार अमित गोरखेंचा पाठिंबा

‘मी स्वतः एमपीएससीचा विद्यार्थी; विद्यार्थ्यांचा आवाज आगामी अधिवेशनात बुलंद करणार’

पुढारी वृत्तसेवा

​पुणे: मी स्वतः एकेकाळी एमपीएससीचा विद्यार्थी होतो. घरच्या परिस्थितीमुळे मला यश मिळाले नाही, तरी पिंपरी-चिंचवडवरून पुण्यात चाणक्य मंडळात अभ्यासासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांची वेदना मी जवळून अनुभवली आहे. सध्या एमपीएससीचे विद्यार्थी वस्तुनिष्ठ (ऑब्जेक्टिव्ह) पद्धतीसाठी लढा देत असून, आमच्या पूर्ण पाठिंबा त्यांच्या पाठीशी आहे, अशी ग्वाही आमदार अमित गोरखे यांनी दिली.

पुण्यातील शास्त्री रस्त्यावर आंदोलनाला बसलेल्या एमपीएससी विद्यार्थ्यांना भेट दिल्यानंतर ते बोलत होते. आमदार गोरखे म्हणाले, गर्दी जमवून विद्यार्थ्यांचा मौल्यवान वेळ वाया घालवला जात आहे. वस्तुनिष्ठ प्रश्नांमध्ये ''दूध का दूध आणि पाणी का पाणी'' स्पष्ट होते, म्हणूनच विद्यार्थी या पद्धतीचा आग्रह धरत आहेत. मी स्वतः एमपीएससीचा विद्यार्थी राहिलो असल्याने या विद्यार्थ्यांबद्दल मला मनापासून आत्मियता आहे. त्यांचा हा बुलंद आवाज बनून मी आगामी विधिमंडळ अधिवेशनात मांडेन.

​विद्यार्थ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून राजकारण...

या वेळी विरोधकांवर टीका करताना आमदार गोरखे म्हणाले, एमपीएससीच्या माध्यमातून आजवर अनेक विद्यार्थी उच्च पदांवर पोहोचले आहेत, याचे श्रेय सरकारने घेतलेल्या निर्णयांना जाते. मात्र, काही लोक या संवेदनशील मुद्द्यावर राजकारण करून विद्यार्थ्यांचे नुकसान करत आहेत. विद्यार्थ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून गोळ्या चालवण्याचे काम सुरू आहे. अध्यक्षांचा राजीनामा कोण घेणार? याचा अभ्यास करूनच काहींनी वक्तव्ये करावीत.

​अफवांवर विश्वास ठेवू नका; मुख्यमंत्री प्रश्न सोडवतील..

विद्यार्थ्यांनी सरकारवर आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर विश्वास ठेवावा, असे आवाहन करत त्यांनी पुढे सांगितले, काही मंडळी याप्रकरणी खोटा नेरेटिव्ह (प्रचार) पसरवण्याचा प्रयत्न करत आहेत. विद्यार्थ्यांनी अशा अफवांकडे लक्ष देऊ नये. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यापूर्वीही विद्यार्थ्यांचे प्रश्न तातडीने सोडवले आहेत आणि हा प्रश्नही ते नक्कीच मार्गी लावतील. आगामी अधिवेशनात एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचे प्रश्न सुटावेत, यासाठी आम्ही स्वतः पुढाकार घेणार आहोत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT