पुणे: अमेरिकेत राहत असलो तरी भारत, महाराष्ट्र आणि आपल्या पुण्याशी माझे नाते अतूट आहे. त्यामुळेच महापालिकेच्या निवडणुकीत मतदानाचा सर्वश्रेष्ठ हक्क बजावावा, यासाठी मी अमेरिकेतून पुण्यात आलो आहे. मी गुरुवारी (दि. 15) मार्केट यार्ड केंद्रावर मतदानाचा हक्क बजावणार असून, मी पहिल्यांदाच मतदान करणार असल्यामुळे आनंदी आहे.
आपण जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात असू देशाचे नागरिक म्हणून आपण आपला मतदानाचा हक्क बजावला पाहिजे. आपल्या मतदानाने पुण्याचा विकासाला गती मिळेल, अशी भावना अमेरिकेत नोकरी, शिक्षणानिमित्त वास्तव्यास असलेल्या विक्रांत देठे याने व्यक्त केली.
पुणे महापालिकेसाठी विविध केंद्रांवर गुरुवारी (दि. 15) मतदानाची प्रक्रिया होणार आहे. त्यासाठी पुणेकर मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्याच पार्श्वभूमीवर विक्रांत देठे याने अमेरिकेतून पुणे गाठले आहे आणि तो प्रभाग क्रमांक 20 शंकर महाराज मठ-बिबवेवाडीसाठी मतदान करणार आहे.
मतदानासाठी काही दिवसांची सुटी घेऊन तो पुण्याला आला आहे आणि मतदान झाल्यानंतर तो गुरुवारी अमेरिकेला जाणार आहे. दोन वर्षांपूर्वी शिक्षणासाठी विक्रांतने अमेरिका गाठली. आता तो कोलंबसमध्ये एका कंपनीत नोकरी करतोय, तर नार्थ कैरोलीना स्टेट युनिर्व्हसिटी येथे इंजिनिअरिंग मॅनेटमेंटचे पदव्युत्तर शिक्षणही घेत आहे.
याविषयी विक्रांत म्हणाला, माझे आई-वडिल पुण्यात वास्तव्यास आहेत. मी दोन वर्षांपूर्वी शिक्षणानिमित्त अमेरिकेला गेलो. आता मी येथे नोकरीसह शिक्षणही पूर्ण करत आहे. अमेरिकेत राहत असलो तरी आपल्या देशाशी, महाराष्ट्राशी आणि पुण्याशी माझे नाते तेवढेच अतूट आहे. त्यामुळेच भारताचा नागरिक म्हणून मतदान करणे हे मी माझे कर्तव्य समजतो.
पुण्यात वाहतूक कोंडी असो वा अपुरा पाणी पुरवठा अशा समस्या कायम आहेत. अमेरिकेत असे चित्र पाहायला मिळत नाही. अगदी पायाभूत सुविधा असो वा वाहतूकीचे नियमांचे पालन...याकडे प्राधान्याने लक्ष देण्यात येते. पुण्यातही असेच चित्र पाहायला मिळावे, असे वाटते. त्यामुळेच आपण योग्य उमेदवार निवडून देऊन पुण्याच्या विकासासाठी योगदान द्यावे, म्हणून मी लांबचा प्रवास करून पुण्यात आलो आहे, तर पुणेकरांनीही मोठ्या प्रमाणात घराबाहेर पडून मतदानाचा हक्क बजावावा. हे पुण्याच्या विकासासाठी महत्त्वाचे पाऊल ठरेल.विक्रांत देठे