पुणे

तळेगाव: वाहतूककोंडीत अडकली रुग्णवाहिका, बाजारच्या दिवशी रस्त्यावर बसणार्‍या विक्रेत्यांमुळे नागरिकांमध्ये नाराजी

अमृता चौगुले

तळेगाव दाभाडे (पुणे): तळेगावातील आठवडे बाजाराच्या दिवशी रस्त्यावर बसणार्‍या विक्रेत्यांमुळे अत्यावश्यक सेवेतील रुग्णवाहिकेलादेखील तिष्ठत उभे रहावे लागत असल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली. तसेच, अडथळा ठरणार्‍या व्यावसायिकांना व्यवसाय करण्यासाठी पर्यायी जागा द्यावी, अशी मागणी केली जात आहे.

मावळ तालुक्यातील मुख्य बाजारपेठ म्हणून तळेगावला पहिल्यापासून पसंती आहे. या ठिकाणी भरणार्‍या आठवड्या बाजारामध्ये भाजीपाला, फळभाजी, मसालेचे पदार्थ, कपडे तसेच लहानांपासून वयोवृद्ध नागरिकांपर्यंत लागणार्‍या सर्व प्रकारच्या गरजेच्या गोष्टी विक्रीसाठी व्यावसायिक या ठिकाणी रविवारच्या दिवशी विविध ठिकाणांवरून घेऊन येत असतात. या रविवारच्या बाजारची परंपरा अनेक वर्षांपासून कार्यरत आहे.

रुग्णवाहिकेसाठी रस्ता देणे गरजेचे

आठवडे बाजार गावातील मुख्य रस्त्यावर व्यावसायिक आपले व्यवसाय मांडून बसत असतात. याच रस्त्यावर तळेगाव दाभाडेचे प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. तसेच, शवविच्छेदन करण्यासाठी असलेली खोलीदेखील आहे. अशावेळी बाजारामुळे वाहतुकीत मोठी अडचण निर्माण होत असून रुग्णवाहिकादेखील पटकन संकेतस्थळी पोहोचू शकत नाही.

यासाठी जिजामाचा चौक ते गणपती चौकपर्यंतचा रस्ता रविवारच्या दिवशी गावठाणातील नागरिकांना ये-जा करण्यासाठी आणि आपत्कालीन घटना झाली तर धावपळ करण्यासाठी हा रस्ता मोकळा असणे आवश्यक आहे. तसेच, शवविच्छेदन करण्याच्या खोलीपर्यंत व प्राथमिक आरोग्य केंद्राच्या समोरील रस्ता आठवडे बाजारच्या दिवशी मोकळा असणे आवश्यक आहे.

परिसरातील नागरिकांना दुचाकी बाहेर काढणेदेखील अवघड

दिवसेंदिवस तळेगावच्या नागरिकीकरणामध्ये झपाट्याने वाढ होत आहे. हा आठवड्याचा बाजार भरण्याचे ठिकाण मुख्य बाजारपेठेमध्येच आहे. त्यामुळे रविवारच्या दिवशी ज्यांच्या दारासमोर, हा बाजार भरतो, त्या परिसरातील नागरिकांना स्वतःची दुचाकीदेखील बाहेर काढता येणे शक्य होत नाही. काही आपत्कालीन घटना घडली तर या बाजारामुळे त्या ठिकाणी रुग्णवाहिकादेखील येणे अशक्य असते. या सर्व बाबींना नागरिक बरेच वर्षांपासून तोंड देत आहेत.

हेही वाचा:

SCROLL FOR NEXT