वडगाव मावळ : मावळ तालुक्यातील एकवीरा देवी मंदिर परिसर विकास आराखडा व रोप-वे, पुणे-मुंबई महामार्गावर 8 ठिकाणी उड्डाणपूल, जांभूळ येथे क्रीडा संकुलसाठी जागा व लोणावळा येथील ग्लास स्काय वॉक प्रकल्पाचा विकास आराखडा या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांना गती देण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज मुंबई येथे मंत्रालयात झालेल्या बैठकीत केली.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मावळ विधानसभा मतदारसंघातील महत्त्वाकांक्षी प्रकल्पांना गती देण्यासाठी मंत्रालयात बैठक संपन्न झाली. या बैठकीस सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, आमदार सुनील शेळके तसेच वित्त व नियोजन विभाग, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत मावळ तालुक्यातील विकासकामे व महत्त्वाकांक्षी प्रकल्पांची सद्यस्थिती तसेच त्यावरील पुढील कार्यवाही यावर सविस्तर चर्चा झाली. या वेळी प्रामुख्याने आई एकवीरा देवी मंदिर परिसर विकास आराखडा व रोप-वे उभारणे या कामास गती देण्यासाठी वन विभाग व पुरातत्त्व विभागाच्या संपूर्ण परवानग्या दोन महिन्यांच्या आत घेण्याच्या सूचना अधिकार्यांना देण्यात आल्या.
जुन्या पुणे-मुंबई-पुणे महामार्गावरील वाहतूककोंडी व अपघात रोखण्यासाठी कार्ला ते देहूरोडदरम्यान आवश्यक असलेल्या आठ ठिकाणी उड्डाणपूल उभारण्यासाठीच्या प्रस्तावाला रस्ते विकास महामंडळाच्या अधिकार्यांनी केंद्रीय स्तरावर पाठपुरावा करण्याच्या सूचना देण्यात आल्या. जांभूळ येथे क्रीडा संकुल उभारण्यासाठी जागा उपलब्ध करून देण्याचा प्रस्ताव महसूल विभागाकडे सादर केलेला असून, तालुकास्तरीय अद्ययावत क्रीडा संकुल उभारण्यासाठी तात्काळ मान्यता द्यावी, अशीही सूचना देण्यात आली. ग्लास स्कायवॉक प्रकल्पाचा संपूर्ण विकास आराखडा राबविण्याबाबत सविस्तर चर्चा झाली.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मावळ तालुक्यातील महत्त्वाकांक्षी प्रकल्पांना गती देण्याच्या सूचना बैठकीत दिल्याने मावळच्या सर्वांगीण विकासाच्या दूरदृष्टीतून या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांच्या कामांचा वेग वाढणार आहे. तसेच, संबंधित प्रकल्प लवकरात लवकर सुरू होण्यालाही गती मिळेल.
– सुनील शेळके, आमदार
हेही वाचा