मंचर: आंबेगाव तालुक्यातील थोरांदळे येथे दरोडेखोरांनी धुमाकूळ घालत दामोदर जयराम मिंडे (वय 62) या शेतकऱ्याची धारदार शस्त्राने हत्या केली. ही घटना मंगळवारी (दि. 31) सकाळी उघडकीस आली. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी सकाळी नीलेश टेमगिरे हनुमान मंदिराच्या कामानिमित्त मंदिराचे विश्वस्त दामोदर मिंडे यांच्या घरी गेले असता त्यांना मिंडे रक्तबंबाळ स्थितीत मृत झाल्याचे आढळले. त्यांच्या डोक्यावर धारदार हत्याराने वार करण्यात आला होता. त्यांनी सरपंच जे. डी. टेमगिरे, उपसरपंच संदीप टेमगिरे, पोलिस पाटील वैशाली टेमगिरे, संजय टेमगिरे यांना याबाबत माहिती दिली. त्यांनी पोलिसांना याबाबत कळविले. मंचर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. याबाबत दामोदर मिंडे यांची विवाहित मुलगी गीतल सतीश गावडे यांनी मंचर ठाण्यात फिर्यात दिली आहे.
फिर्यादीत म्हटले आहे की, वडील दामोदर मिंडे हे घरात एकटेच झोपले असताना दरोडेखोरांनी त्यांच्या डोक्यावर शस्त्राने वार करून त्यांची हत्या केली. त्यानंतर घरातील साहित्याची उचकापाचक करून काही वस्तू घराबाहेरील झाडाखाली टाकल्या. या घटनेनंतर चोरट्यांनी राधू बबन विश्वासराव यांच्या घरासमोर बांधलेला बैल सोडून लोखंडी खुंटी चोरली. घरातील सदस्यांना दरोडेखोरांच्या हालचालीची चाहूल लागताच त्यांनी आरडाओरडा केला. सीसीटीव्ही कॅमेऱ्यात तीन संशयित कैद झाले आहेत.
त्यानंतर दरोडेखोरांनी लक्ष्मण बबन विश्वासराव यांच्या बंद घराचा दरवाजा तोडून घरातील साहित्याची उचकापाचक केली. त्यांची मुले मुंबईला असल्यामुळे नेमके काय चोरीला गेले हे समजू शकले नाही. त्यानंतर दरोडेखोरांनी तेथून अर्धा किलोमीटरवर असलेले शेतकरी विलास नारायण टेमगिरे यांचे बंद घराचा दरवाजा पहारीने तोडण्याचा प्रयत्न दरोडेखोरांनी केला. पहारीचा आवाज झाल्याने पडवीत झोपलेले विलास टेमगिरे जागे झाले. त्यांनी आरडाओरडा केला असता चोरटे पळून गेले. त्यांनी आजूबाजूच्या लोकांना याची माहिती दिली.
अपर पोलिस अधीक्षक रमेश चोपडे, उपविभागीय अधिकारी अमोल मांडवे, मंचरचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक श्रीकांत कंकाळ, एलसीबीचे पोलिस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर, उपनिरीक्षक सनिल धनवे यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली. पोलिसांनी ठसेतज्ज्ञ व श्वान पथकाच्या मदतीने तपास सुरू केला आहे. आरोपींचा लवकरच शोध लागेल, असे उपविभागीय अधिकारी मांडवे यांनी सांगितले.