पारगाव: आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागात मोकाट कुर्त्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. रस्त्यावर टोळक्याने फिरणारी ही कुत्री दुचाकीस्वार आणि नागरिकांसाठी चांगलीच डोकेदुखी ठरत आहेत. या कुत्र्यांच्या बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांनी तातडीने केली आहे.
रस्त्यावर 10 ते 15 कुत्र्यांचे टोळके मुक्तपणे फिरताना सहज दिसतात. रस्त्याने जाणाऱ्या नागरिकांवर ही कुत्री भुंकतात तसेच संपूर्ण रस्ता अडवून चालतात. यामुळे शाळकरी मुले व दुचाकीस्वार यांना मोठ्या भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
अनेक वेळा ही कुत्री दुचाकीस्वारांच्या मागे धावत त्यांच्या वाहनाचा समतोल बिघडून अपघात झाल्याच्या घटना घडल्या आहेत. शेती पिकांचेही या मोकाट कुर्त्यांकडून मोठे नुकसान होत आहे. काढणीस आलेल्या पिकांमध्ये घुसून ही कुत्री लोळण घेतात व शेतमालाची नासधूस करतात.
त्यामुळे शेतकऱ्यांमध्येही या समस्येबाबत नाराजी व्यक्त होत आहे. नागरिकांनी ग््राामपंचायतीने तातडीने उपाययोजना करून या मोकाट कुत्र्यांना आळा घालावा, अशी मागणी केली आहे.
कुत्र्यांमुळे बिबटे वस्तीत
अलीकडच्या काळात नागरिक व जनावरांवर बिबट्यांचे हल्ले वाढले आहेत. मोकाट कुत्री ही बिबट्यांची सहज उपलब्ध शिकार असल्याने बिबटे अन्नाच्या शोधात नागरी वस्तीकडे वळत आहेत. त्यामुळे रहिवासी भागात वन्यप्राण्यांचा वावर वाढून धोका निर्माण झाला आहे.