Dimbhe Right Canal Pudhari
पुणे

Dimbhe Right Canal: आंबेगाव-शिरूरमधील ४५ गावांवर पाणीटंचाईचे संकट; डिंभे उजव्या कालव्याला पाणी सोडण्याची मागणी

पावसाअभावी उभी पिके करपू लागली; पिण्याचे पाणी आणि जनावरांच्या चाऱ्याचाही प्रश्न गंभीर, शेतकरी दिलीप वळसे पाटील यांची भेट घेणार

पुढारी वृत्तसेवा

मंचर: आंबेगाव आणि शिरूर तालुक्यांतील ४५ गावांमध्ये पाणीटंचाईची तीव्रता वाढू लागल्याने हुतात्मा बाबू गेनू सागर (डिंभे) उजव्या कालव्याला तातडीने पाणी सोडण्याची मागणी शेतकरी आणि ग्रामस्थांनी केली आहे. पावसाअभावी शेतीला पाणी मिळणे कठीण झाले असून, उभी पिके करपू लागली आहेत. काही गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची टंचाईही जाणवू लागल्याने ग्रामीण भागातील परिस्थिती चिंताजनक बनली आहे.

या परिसरातील शेती मोठ्या प्रमाणावर कालव्याच्या पाण्यावर अवलंबून आहे. मात्र, पाण्याअभावी पिके जगविण्यासाठी शेतकऱ्यांची धावपळ सुरू आहे. विहिरी, कूपनलिका आणि पाझर तलावांमधील पाणीसाठा कमी होत असल्याने सिंचनाचा प्रश्न गंभीर बनला आहे. वेळेत पाणी उपलब्ध न झाल्यास पिकांचे मोठे नुकसान होण्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. शेतीबरोबरच जनावरांच्या पिण्याच्या पाण्याची आणि चाऱ्याची उपलब्धता करणेही कठीण होत आहे.

डिंभे उजव्या कालव्याला पाणी सोडल्यास परिसरातील शेतीला दिलासा मिळण्याबरोबरच काही गावांतील पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही मार्गी लागू शकतो. त्यामुळे संबंधित विभागाने तातडीने निर्णय घेऊन कालव्याचे आवर्तन सुरू करावे, अशी मागणी शेतकरी आणि ग्रामस्थांनी केली आहे.

या प्रश्नाकडे लोकप्रतिनिधींचे लक्ष वेधण्यासाठी शेतकऱ्यांचे शिष्टमंडळ लवकरच माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची भेट घेणार असल्याची माहिती पंचायत समिती सदस्य नीलेश टेमकर यांनी दिली. पाणीटंचाईची तीव्रता लक्षात घेऊन संबंधित यंत्रणेने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

डिंभे उजव्या कालव्यावर अवलंबून असलेल्या ४५ गावांमध्ये पाणीटंचाई गंभीर होत आहे. पिके करपू लागली असून, पिण्याचे पाणी आणि जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. कालव्याला तातडीने पाणी सोडण्यासाठी शिष्टमंडळ दिलीप वळसे पाटील यांची भेट घेणार असल्याचे पंचायत समिती सदस्य नीलेश टेमकर यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT