पारगाव : आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागातील थोरांदळे, रांजणी, नागापूर, शिंगवे, पारगाव, काठापूर या गावांमध्ये बटाटा काढणी सुरू झाली आहे. यंदा अतिपावसामुळे उत्पादनात घट झाली असून बाजारभावही गतवर्षीच्या तुलनेत कमी मिळत असल्याने बटाटा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण दिसत आहे. (Latest Pune News)
शेतकऱ्यांच्या मते, पावसाळ्याच्या सुरुवातीला पावसाने समाधानकारक हजेरी लावल्यामुळे बटाटा लागवड क्षेत्रात वाढ झाली. मात्र, त्यानंतर पडत राहिलेल्या परतीच्या पावसामुळे बटाटा पिकामध्ये पाणी साचून उत्पादनावर परिणाम झाला.
सध्या नागापूर, थोरांदळे, रांजणी परिसरात काढणीला सुरुवात झाली असून बाजारभाव देखील अपेक्षेप्रमाणे नाही. गतवर्षी दहा किलो बटाट्याला साधारणत: 300 रुपये मिळत असताना, यंदा सुरुवातीला दहा किलोला 200 रुपये मिळत आहेत. बटाटा बियाण्यांचा खर्चदेखील जास्त होता; शेतकऱ्यांनी क्विंटलला 4 हजार रुपये दराने बियाणे खरेदी करून लागवड केली, त्यानंतर मजुरी, औषध फवारणी आणि इतर खर्च जोडल्यास भांडवल वसूल होण्याची शक्यता कमी आहे.
शेतकऱ्यांचा अनुभव सांगतो, ’यंदा पावसामुळे बियाणे महाग असतानाही जास्त प्रमाणात लागवड केली, परंतु परतीच्या पावसामुळे उत्पादन घटले आणि बाजारभाव समाधानकारक नाही. सध्या किलोला 20 रुपये मिळत आहेत, जे भांडवलाच्या तुलनेत खूप कमी आहेत,’ असे नागापूर येथील बटाटा उत्पादक शेतकरी नवनाथ मिंडे यांनी सांगितले.