Ambegaon Groundnut Farming Pudhari
पुणे

Ambegaon Groundnut Farming: आंबेगाव-मंचर परिसरात उन्हाळी भुईमूग काढणीला वेग; उष्णतेचा उत्पादनावर परिणाम

किडींचा प्रादुर्भाव व वाढत्या तापमानामुळे उत्पादन घटण्याची शक्यता; मात्र बाजारभाव समाधानकारक असल्याने शेतकऱ्यांना दिलासा

पुढारी वृत्तसेवा

मंचर: आंबेगाव तालुक्यासह परिसरात उन्हाळी भुईमूग पिकाची काढणी सध्या वेगाने सुरू झाली आहे. मात्र, यंदा वाढलेल्या उष्णतेचा परिणाम उत्पादनावर दिसून येत असल्याचे शेतकरी सांगत आहेत.

मागील काही वर्षांत भुईमूग लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे. त्यानुसार या भागात यंदाही मोठ्या प्रमाणावर लागवड करण्यात आली होती. फेब्रुवारी महिन्यात पेरणी केलेल्या भुईमूग पिकाची आता काढणी सुरू आहेत. शेतकरी शेंगा उपटणे, वाळवणे आणि मळणीच्या कामात व्यस्त असल्याचे दिसून येत आहे.

यंदा वाढलेल्या तापमानाचा परिणाम भुईमूग पिकावर दिसून आला आहे. तीव्र उष्णतेमुळे भुईमुगाच्या पाल्यावर किडीचा प्रादुर्भाव वाढला. अनेक ठिकाणी शेंगांची फुगवण क्षमता कमी झाली आहे. त्यामुळे अपेक्षित उत्पादनात काही प्रमाणात घट होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

बाजारात सध्या भुईमूग शेंगांना प्रतवारीनुसार दहा किलोसाठी साडेतीनशे ते सहाशे रुपये दर मिळत आहे. दर्जेदार आणि भरलेल्या शेंगांना अधिक मागणी असल्याचे व्यापाऱ्यांकडून सांगण्यात येते. भुईमूग हे नगदी पीक म्हणून शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरत आहे. त्याचा पाला जनावरांसाठी पौष्टिक चारा म्हणून उपयोगी पडतो. त्यामुळे शेंगांबरोबरच पाल्यापासूनही शेतकऱ्यांना आर्थिक लाभ मिळत आहे. यामुळे उन्हाळी भुईमूग लागवड ग्रामीण भागातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा पर्याय ठरत आहे.

यंदा भुईमूग पिकाची वाढ चांगली झाली होती. मात्र, वाढलेल्या उष्णतेमुळे पाल्यावर किडीचा प्रादुर्भाव झाला आणि काही प्रमाणात शेंगांची फुगवण कमी झाली. तरीही मिळणारा बाजारभाव समाधानकारक असल्याने उत्पादनातून खर्च निघण्याची अपेक्षा आहे.
अप्पा टाव्हरे, शेतकरी भोकरवाडी.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT