पारगाव: आंबेगाव तालुक्यातील थोरांदळे गावाच्या शिवारात शेतात तुटून पडलेल्या विजेच्या तारेचा शॉक लागून धनगर मेंढपाळ कुटुंबातील एका महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी (दि. १४) सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास घडली. संगीता बाबाजी तिकुळे (वय ३०) असे मृत महिलेचे नाव आहे. या घटनेमुळे थोरांदळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, मूळचे अहिल्यानगर जिल्ह्यातील गाजीपूर येथील बाबाजी जानको तिकुळे हे धनगर मेंढपाळ कुटुंब गेल्या अनेक वर्षांपासून थोरांदळे गावठाण परिसरात वास्तव्यास आहे. गुरुवारी सकाळी संगीता तिकुळे यांनी आपल्या पतीसह कुटुंबीयांना जेवण दिल्यानंतर शेजारील विहिरीवर कपडे धुण्यासाठी गेल्या होत्या.
कपडे धुऊन परत येत असताना शेतातील हत्ती गवतात विजेची तार तुटून पडलेली होती. गवत दाट असल्याने ती तार त्यांच्या नजरेस पडली नाही. शेतातून येत असताना सदर तार त्यांच्या गुडघ्याला स्पर्श होताच त्यांना जोरदार विजेचा धक्का बसला. धक्क्यामुळे त्या गवतातच कोसळल्या.
घटनेची माहिती मिळताच उपसरपंच अॅड संदीप टेमगिरे, पोलीस पाटील वैशाली टेमगिरे, अमर बारवकर व परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र, तोपर्यंत संगीता तिकुळे यांचा जागीच मृत्यू झाला होता. या घटनेमुळे धनगर मेंढपाळ कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरात शोककळा पसरली आहे.
दरम्यान, शेतशिवारात तुटलेल्या विजेच्या तारा वेळेत दुरुस्त न केल्याने नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. अशा धोकादायक तारा तातडीने हटवून वीज यंत्रणेची नियमित पाहणी करावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.