डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या विस्तारीकरणाच्या मागणीसाठी आंबेडकरी संघटनांनी सोमवारी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या जनसंपर्क कार्यालयावर मोर्चा काढला. Pudhari
पुणे

Ambedkar Memorial Protest: मोहोळ यांच्या कार्यालयावर आंबेडकरी संघटनांचा ठिय्या मोर्चा

डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या विस्तारीकरणासाठी आंदोलन

पुढारी वृत्तसेवा

पुणे : डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या विस्तारीकरणाच्या मागणीसाठी आंबेडकरी संघटनांनी सोमवारी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या जनसंपर्क कार्यालयावर मोर्चा नेत ठिय्या आंदोलन केले. स्मारक विस्ताराच्या आश्वासनाला तीन महिने उलटूनही निर्णय न झाल्याने आंदोलकांनी या वेळी घोषणाबाजी केली.(Latest Pune News)

पुणे रेल्वे स्थानकाजवळील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन विस्तारासाठी पूर्वीच 8 हजार 900 चौरस मीटर जागा मालधक्का चौकात आरक्षित करण्यात आली होती. मात्र, ही जागा खासगी कंपनीला देण्यात आल्याने स्मारक समितीने आंदोलनाचा मार्ग अवलंबला.

या मागणीसाठी झालेल्या पूर्वीच्या आंदोलनात केंद्रीय राज्यमंत्री मोहोळ यांनी ‌’आठ दिवसांत करार रद्द करून जागा स्मारकासाठी उपलब्ध करून दिली जाईल‌’ असे आश्वासन दिले होते. त्या वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही मोहोळ यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून मागणी सकारात्मकपणे मान्य केली जाईल, असे देखील आश्वासन दिले होते. मात्र, अडीच महिने उलटूनही प्रत्यक्षात कोणतीही कारवाई न झाल्याने समिती आणि आंबेडकरी संघटनांनी आक्रमक पवित्रा घेत मोहोळ यांच्यावर ‌’खोटे आश्वासन देऊन फसवणूक केली‌’ असा आरोप केला आहे.

करार रद्द करा, अन्यथा जनआंदोलन!

आंदोलनादरम्यान समितीच्या पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले की, स्मारकासाठी आरक्षित असलेली जागा खासगी कंपनीकडे ठेवण्याचा करार रद्द झाला नाही, तर शहरभर निषेध सभा आणि जनआंदोलन छेडले जाईल. डॉ. आंबेडकरांच्या स्मारकाचा विस्तार हा आमचा हक्काचा प्रश्न आहे. सत्ताधाऱ्यांनी तो मान्य केला नाही, तर रस्त्यावर उतरावे लागेल, असा इशाराही समितीकडून देण्यात आला.

अनेक वर्षांपासून प्रश्न प्रलंबित

स्मारकाच्या विस्तारीकरणाचा विषय गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. पुण्यातील आंबेडकरी संघटना सातत्याने ही मागणी करत आहेत. आरक्षित जागा खासगी कंपनीला देण्यात आल्याने या संघटनांचा रोष अधिक वाढला आहे. मोहोळ आणि फडणवीस यांच्या आश्वासनानंतर काही काळ आशा निर्माण झाली होती; मात्र, आता पुन्हा तीच स्थिती असल्याने संघटनांनी थेट मोहोळ यांच्या कार्यालयासमोर आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT