Land Scam Pudhari
पुणे

Mundhwa Land Scam: मुंढवा जमीन घोटाळा: अमेडिया कंपनीला 23 कोटी रुपये भरावेच लागणार

21 कोटी मुद्रांक शुल्क व दंडासह रक्कम भरण्याचा नोंदणी महानिरीक्षकांचा निर्णय

पुढारी वृत्तसेवा

पुणे: मुंढवा येथील सरकारी जमीन गैरव्यवहारप्रकरणी खासदार पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला बुडविलेले 21 कोटी रुपयांचे मुद्रांक शुल्क व त्यावरील 2 कोटींचा दंड भरावाच लागणार आहे. नोंदणी महानिरीक्षक रवींद्र बिनवडे यांनी हा निकाल दिला आहे. याविरोधात महसूलमंत्र्यांकडे अपील करण्यासाठी 60 दिवसांचा अवधी देण्यात आला आहे.

उद्योग विभागाच्या इरादापत्राच्या आधारे कंपनीने मुद्रांक शुल्कात सवलत मागितली होती. मात्र, याबाबतची ठोस कागदपत्रे सादर करण्यात अपयश आले. परिणामी, बिनवडे यांनी बुडविलेल्या 21 कोटी रुपयांच्या मुद्रांक शुल्काची सवलतीची मागणी फेटाळून लावली. त्यानुसार कंपनीला एकूण 23 कोटी रुपये भरावे, असेही निकालात नमूद केले आहे. अमेडिया एंटरप्राईजेस कंपनीचे भागधारक दिग्विजयसिंह पाटील यांनी कुलमुखत्यारधारक शीतल तेजवानी यांच्याकडून मुंढवा येथील बोटॅनिकल सर्व्हे ऑफ इंडियाच्या 40 एकर जमिनीची खरेदी 300 कोटी रुपयांमध्ये केल्याचा गैरव्यवहार उघड झाला.

या ठिकाणी आयटी पार्क उभारण्यात येणार असल्याचे सांगून उद्योग संचालनालयाकडून इरादापत्र घेण्यात आले. त्यामुळे मुद्रांक शुल्कात सवलत मिळावी, यासाठी अर्ज करून 21 कोटी रुपयांच्या मुद्रांक शुल्काची सवलत घेऊन महसूल बुडविल्याचे समोर आले. त्यामुळे संबंधित प्रकरणात संबंधित दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करत सहजिल्हा निबंधक संतोष हिंगाणे यांनी अमेडिया एंटरप्राईजेसला मुद्रांक शुल्क बुडविल्याबाबत नोटीस पाठवली होती. याबाबत कंपनीकडून उद्योग विभागाच्या इरादापत्राचा आधार घेत नोंदणी महानिरीक्षकांकडे अपील करण्यात आले होते.

त्यानुसार सुनावणी प्रक्रिया सुरू होती. मात्र, बिनवडे हे पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक कार्यक्रमासाठी कर्तव्यावर असल्याने सुनावणी पुढे ढकलण्यात आली होती. तोपर्यंत अमेडिया कंपनीला उद्योग विभागाची कागदपत्रे सादर करण्यासाठी कालावधी उपलब्ध होता. मात्र, कंपनीकडून याबाबतची कागदपत्रे सादर करण्यात आली नसल्याने बिनवडे यांनी सुनावणी प्रक्रिया पूर्ण करत बुडविलेला 21 कोटी रुपयांचा मुद्रांक आणि त्यावरील दंडाची 2 कोटी रुपयांची रक्कम अशी एकूण 23 कोटींची रक्कम भरावी लागणार असल्याचा निकाल जाहीर केला.

उद्योग संचालनालयाकडून इरादापत्र घेत दस्त नोंदणीवेळी मुद्रांक शुल्कात सवलत मागितली. त्यावर सुनावणीदरम्यान कंपनीकडून कागदपत्रे सादर करण्यात आली नाहीत. त्यामुळे त्यांची मागणी फेटाळून लावत 21 कोटी रुपयांचे बुडविलेले मुद्रांक शुल्क आणि सुमारे दोन कोटी व्याजासह दंड असे एकूण 23 कोटी रुपये भरावे लागणार आहेत.
रवींद्र बिनवडे, नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT