पुणे: लहरी हवामानामुळे उत्पादनात चाळीस टक्क्यांनी घट झाल्याने हापूसचा हंगाम यंदा येत्या दहा दिवसांत आटोपण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. शहरातील बाजारपेठेत हापूसची आवक अवघ्या एक हजार पेट्यांवर आली असून हंगामाच्या अखेरीसही हापूसचे दर चढेच आहेत.
दरवर्षी हंगामाच्या अखेरीस 400 रुपये डझनापर्यंत येणारा हापूस यंदा 600 रुपयांवर टिकून आहे. त्यामुळे, अक्षय्य तृतीयेनंतर मोठ्या प्रमाणात हापूसची चव चाखणार्या पुणेकरांना यंदा महागड्या हापूसवरच समाधान मानावे लागणार आहे. (Latest Pune News)
फळांचा राजा असलेल्या हापूस आंब्याची पुणेकर दरवर्षी वाट पाहत असतात. त्या पार्श्वभूमीवर पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या गुलटेकडी मार्केट यार्डातील फळबाजारात रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड भागातून हापूस मोठ्या प्रमाणात दाखल होतो.
हंगामाच्या सुरुवातीचे दर हे सर्वांना परवडणारे असतातच असे नाही. मात्र, अक्षय्य तृतीयेनंतर हापूसचे भाव सर्वसामान्यांच्या आवाक्यात येत असतात. यंदा वातावरणातील बदलामुळे मोहोर गळाल्याने हंगामाच्या सुरुवातीलाही या आंब्याची आवक कमी होत होती.
त्यामुळे गुढी पाडव्याला आंब्याच्या डझनाला एक हजार ते 1800 रुपये मोजावे लागत होते. मात्र, अक्षय तृतीयाला आवक वाढल्यामुळे डझनाचे दर 400 ते 800 रुपयांपर्यंत खाली आले होते.
यादरम्यान, मागणी वाढू लागली. मात्र, अंतिम टप्प्यात हंगाम आल्याने आवक अपुरी पडू लागली. तसेच, आवक वाढण्याची शक्यता नसल्याने दरात पुन्हा वाढ होऊन 600 ते एक हजार 100 रुपयांवर स्थिरावले आहेत.
मे महिन्याच्या मध्यावधीत चार ते पाच हजार पेट्यांची आवक होते. ती आता अवघ्या एक हजार पेट्यांवर आली आहे. मात्र, हापूसला मागणी चांगली असल्याने गतवर्षीच्या तुलनेत चार ते नऊ डझनाच्या पेटीमागे तीनशे ते एक हजार रुपयांनी वाढ झाली आहे. पुढील दहा दिवस हापूसची आवक होण्याची शक्यता आहे. दरामध्ये घट होण्याची शक्यता दिसून येत नाही.युवराज काची, हापूसचे अडतदार, मार्केट यार्ड.
लहरी वातावरणामुळे यंदा उत्पादनात मोठी घट झाली. याखेरीज अतिउष्णतेचा फटकाही हापूसला बसला. यंदा चांगल्या आकाराच्या हापूसचे प्रमाण कमी राहिले. सद्य:स्थितीत हापूसचा हंगाम संपल्यात जमा आहे. पुढील दहा दिवस हापूसची तुरळक आवक होत राहिल. यंदा सर्वसामान्यांचे मनसोक्त हापूस खायचे इच्छा अपूर्ण राहिली, हे मात्र खरे आहे.अरविंद मोरे, हापूसचे व्यापारी, मार्केट यार्ड.