नारायणगाव: जुन्नर तालुक्यातील 97 ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाचे आरक्षण जाहीर झाल्याने इच्छुक मंडळींनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. गावनेत्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना चुचकारण्यास सुरुवात केली असून, दररोज सकाळ, संध्याकाळ त्यांची बडदास्त सुरू केली आहे. सर्वसाधारण वर्गासाठी सरपंचपद आरक्षण ज्या गावात आहे, त्या गावात याबाबतची मोर्चेबांधणी विशेष पाहायला मिळत आहे. इतर ठिकाणी मात्र सध्या सामसूम वातावरण पाहायला मिळत आहे.
सरपंचपद सर्वसाधारण महिला अथवा सर्वसाधारण गटासाठी जाहीर झाले आहे, त्या गावातील हॉटेल्स व चौक गर्दीने फुलू लागले आहेत. एवढेच नाही तर आषाढ महिना असल्याने काही इच्छुक उमेदवारांनी ‘आखाड पार्टीला ‘ सुरुवात केली आहे. केवळ मांसाहारी जेवणच नाही, तर तळीराम कार्यकर्त्यांची विशेष सोयदेखील केली जात आहे. (Latest Pune News)
काही गावांमध्ये सरपंचपद सर्वसाधारण गटासाठी आरक्षित असले तरी काही इतर मागासवर्गीय प्रवर्गातील इच्छुक उमेदवार मोर्चेबांधणी करताना दिसत आहेत. सरपंचपद सर्वसाधारण गटासाठी आरक्षित असले तरी मागील पाच वर्षांमध्ये आपण गावामध्ये खूप चांगले काम केले आहे. त्यामुळे गावकरी व मतदार आपल्यालाच निवडून देतील, असा काहींचा आत्मविश्वास असून त्यांनी आपल्या सहकार्यांना ‘ओल्या पार्ट्या‘ देण्यास सुरुवात केली आहे.
जुन्नर तालुक्यात 97 ग्रामपंचायतींपैकी 29 ग्रामपंचायती लोकनियुक्त सरपंच सर्वसाधारणगटासाठी आरक्षित झाल्या आहेत. सर्वसाधारण गटामध्ये कोणत्याही प्रवर्गातील व्यक्ती सरपंचपदासाठी अर्ज दाखल करू शकतो. त्यामुळे काही गावांमध्ये इतर प्रवर्गातील उमेदवार सर्वसाधारण गटातदेखील सरपंचपदासाठी अर्ज भरणार असल्याची शक्यता आहे.
अर्थात सर्वसाधारण गटांमध्ये इतर प्रवर्गातील व्यक्तीने सरपंचपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केल्यास काही प्रमाणात त्याचा फटका त्या उमेदवाराला बसू शकतो. परंतु निवडणुकीला काही महिने अवकाश असल्याने आतापासूनच त्या इच्छुक उमेदवारांनी मतदारांना आपलेसे करण्यासाठी वेगवेगळे फंडे अवलंबण्यास सुरुवात केली आहे.