

Railway accident tracking system
पुणे: रेल्वे अपघातांची कारणे शोधणे आणि दोषी निश्चित करणे, हे आता अधिक सोपे होणार आहे. मध्य रेल्वेच्या पुणे विभागाने रेल्वे स्थानकांवर व्हीएचएफ (व्हेरी हाय फ्रीक्वेन्सी डिव्हाइस) उपकरणांसोबत 74 रेकॉर्डिंग युनिट्स बसवण्याचा निर्णय घेतला आहे.
यामुळे रेल्वे परिचालनादरम्यान स्टेशन मास्टर्स, ट्रेनचालक आणि गार्ड यांच्यातील संवादाची नोंद ठेवली जाईल. त्यामुळे अपघातांच्या चौकशीत मोठी मदत होणार आहे. (Latest Pune News)
रेल्वेगाड्यांच्या संचलनादरम्यान स्टेशन मास्टर्स आणि कंट्रोलर व्हीएचएफ डिव्हाइसचा वापर करून मार्गावरील रेल्वे चालक आणि गार्ड यांच्याशी संवाद साधतात. पोलिसांच्या वॉकी-टॉकीप्रमाणेच हे डिव्हाइस कार्य करते. त्यामुळे रेल्वेला कोणत्या ट्रॅकवर घ्यावे, कुठे थांबावे, किंवा आपत्कालीन परिस्थितीत कधी थांबावे, अशा महत्त्वाच्या सूचना दिल्या जातात. मात्र, जर चुकीची सूचना मिळाली आणि त्याच वेळी सिग्नलिंग यंत्रणेत बिघाड झाला, तर मोठ्या अपघाताची शक्यता असते.
अशा वेळी नेमकी चूक कोणाची होती, हे शोधणे कठीण होते. या समस्येवर मात करण्यासाठी, आता रेल्वे स्थानकांवर व्हीएचएफद्वारे होणार्या संवादांचे रेकॉर्डिंग केले जाणार आहे. हे रेकॉर्डिंग युनिट्स अपघाताच्या वेळी नेमकी चूक कोणाची होती.
रेल्वे चालक-गार्डची की, त्यांना चुकीच्या सूचना मिळाल्यामुळे अपघात झाला, हे शोधणे सोपे करेल. पुणे विभागातील 74 रेल्वे स्थानकांवर हे रेकॉर्डिंग युनिट्स बसवण्यात येणार आहेत. यामुळे भविष्यात दुर्दैवाने कोणताही अपघात झाल्यास, त्याचे कारण तत्काळ समोर येईल.
महत्त्वाचे मुद्दे
रेल्वे बोर्डाची मंजुरी
रेकॉर्डिंग तीन महिन्यांपर्यंत होणार जतन
सुमारे पाच कोटी रुपयांपर्यंत खर्च अपेक्षित
पहिल्यांदाच रेल्वे ट्रेनचालक, रेल्वे स्थानक कंट्रोल रूममधील संवादाचे रेकॉर्डिंग
विमानाच्या ब्लॅक बॉक्सप्रमाणे करणार काम
आमच्याकडील रेल्वे स्थानकांवरील व्हीएचएफ सेटच्या माध्यमातून ट्रेनचालक आणि ट्रेनमधील गार्डला सूचना दिल्या जातात. सध्या पुणे विभागातील 74 स्थानकांवर 25 वॅट क्षमतेचे एकूण 25 व्हीएचएफ संच उपलब्ध आहेत. याव्यतिरिक्त स्टेशन मास्टर्स, लोको पायलट्स (एलपी), असिस्टंट लोको पायलट्स (एएलपी) आणि गार्ड्स नियमित संवादासाठी पाच वॅट वॉकी-टॉकीजने सुसज्ज आहेत. सध्याच्या व्हीएचएफ संचांमध्ये स्टेशन मास्टर्स आणि रनिंग स्टाफ, जसे की एलपी, एएलपी आणि गार्ड्स यांच्यात झालेल्या संवादाची नोंद ठेवण्याची सुविधा नाही. म्हणूनच, व्हीएचएफ युनिट्ससाठी रेकॉर्डिंग युनिट बसवण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे. यामुळे कोणत्याही अनुचित घटनेच्या प्रसंगी किंवा तपासासाठी अत्यंत मौल्यवान माहिती उपलब्ध होईल.
- राजेशकुमार शर्मा, विभागीय रेल्वे व्यवस्थापक (डीआरएम), मध्य रेल्वे, पुणे विभाग
रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेसाठी रेल्वे प्रशासन उभारत असलेल्या या उपकरणाचा नक्कीच फायदा होणार आहे. या उपकरणामुळे नक्की अपघात कशामुळे झाला, यात कोणाची चूक होती, हे शोधणे नक्कीच फायद्याचे ठरणार आहे. रेल्वेने याप्रमाणेच प्रवाशांच्या सुरक्षेवर आणखी भर देणे, सध्याच्या काळात महत्त्वाचे आहे. असे होत राहिले तरच भविष्यात होणारे मोठे रेल्वे अपघात रोखण्यात यश मिळणार आहे.
- आनंद सप्तर्षी, सदस्य, प्रादेशिक सल्लागार समिती