पुणे

गावठी दारूच्या फुग्यांचा गावागावांत उच्छाद; जागोजागी प्लास्टिकच्या पिशव्यांचा कचरा

अमृता चौगुले

राजेंद्र खोमणे

नानगाव : दौंड तालुक्यातील भीमा नदीकाठच्या गावागावांत दिवसेंदिवस हातभट्टीची (गावठी दारू) समस्या वाढत चालली आहे. पूर्वी गावाबाहेर व गावात असणार्‍या गुत्त्यांवर जाऊन अशा प्रकारची दारू पिली जात होती. मात्र, सध्या ही दारू प्लास्टिकच्या पिशवीत बांधून विकली जात असल्याने गावात इकडे-तिकडे अशा मोकळ्या दारूच्या पिशव्यांचा उच्छाद दिसून येत आहे.

ग्रामीण भागात ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणावर गावठी दारूचे उत्पादन व विक्री केली जाते. पोलिसांच्या अनेक कारवाया होतात. मात्र, आज कारवाई झाली की उद्या असे धंदे व उत्पादन लगेच सुरू होते. त्यामुळे गावागावांंना लागलेली ही गावठी दारूची कीड कधी संपणार, असा सवाल जाणकार मंडळी करीत आहेत. अशा दारूची वाहतूक यापूर्वी कॅन, ट्यूबमधून होत होती.

रातोरात ही दारू ठिकाण्यावर पोहचत होती व नंतर दिवसभर मद्यपान करणारे नागरिक अशा गुत्त्यांवर जाऊन दारी पित असे. मात्र, यामुळे अशा भागांत मद्यपींची भांडणे, मारामार्‍या होत असत. अनेकदा अशा गुत्त्यांवर गर्दी होत असल्याने बर्‍याचदा पोलिसांनी कारवायादेखील केल्या आहेत.

सध्या गावठी दारूचे उत्पादन व व्यवसाय करणार्‍यांनी मात्र नवीन शक्कल शोधून काढली आहे. दारू उत्पादन झाल्यावर ही दारू विक्रेत्यांपर्यंत प्लास्टिक पिशवीत बंद करून पाठवली जाते. ज्या ठिकाणी अशा दारूची विक्री केली जाते. अशा ठिकाणी दारू पिण्यासाठी आलेल्या व्यक्तीला तो प्लास्टिकचा फुगा देऊन बाजूला पाठविले जाते.

अशा प्लास्टिकच्या फुग्यातील दारू पिण्यासाठी दारू पिणारे गावात कुठेतरी आडोशाला बसून दारू पितात आणि मोकळा झालेला प्लास्टिकचा फुगा त्याच ठिकाणी फेकून देतात. असा हा प्रकार दररोज घडत असल्याने गावात इकडे-तिकडे मोठ्या प्रमाणावर अशा मोकळ्या झालेल्या दारूच्या प्लास्टिकच्या पिशव्या अस्ताव्यस्त पडलेल्या दिसतात.

गावात व ज्या ठिकाणी गावठी दारूचा धंदा असतो अशा ठिकाणीदेखील मोठ्या प्रमाणावर या प्लास्टिकच्या पिशव्या आढळून येतात. दारूधंदा करणारे घरातील मोकळ्या झालेल्या पिशव्या गावच्या कडेला कुठेतरी टाकून देतात, तर गावात अस्ताव्यस्त पडलेल्या प्लास्टिकच्या पिशव्या हवेच्या झोक्यावर इकडे-तिकडे उडत असतात. अगोदरच गावागावांत कचर्‍याचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.

त्यातच अशा प्रकारे अवैध गावठी दारूचे उत्पादन व विक्री करणार्‍यांनी गावागावांत प्लास्टिकच्या कचर्‍याची भर घातल्याची वस्तुस्थिती दिसून येत आहे. पूर्वी दारू पिणार्‍यांचा त्रास ग्रामस्थांना सहन करावा लागत होता. मात्र, सध्या पिणार्‍यांबरोबर अशा प्रकारे प्लास्टिकच्या कचर्‍याचादेखील गावकर्‍यांना त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे अशा अवैध व्यवसायांवर कडक कारवाई करण्याची मागणी गावागावांतून पुढे येत आहे.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT