पुणे

अलंकापुरी भक्तिरसात न्हाली; भाविकांनी आळंदी दुमदुमली

Laxman Dhenge

आळंदी : पुढारी वृत्तसेवा : मुखी 'ज्ञानोबा तुकाराम'चा जयघोष, खांद्यावर भगव्या पताका… गळ्यात तुळशीची माळ आणि टाळ-मृदंगाचा गजर करत राज्यभरातील लाखो वारकरी, भाविक श्रीसंतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सोहळ्या (कार्तिकी यात्रा) निमित्त आळंदीत दाखल होत आहेत. इंद्रायणी नदीतीरी, धर्मशाळा, मठ, मंदिर परिसर, सिद्धबेट परिसर तसेच ठिकठिकाणी पडलेल्या राहुट्यांतून भजन, कीर्तनाचे सूर घुमू लागले असून, दिंड्या, वाहनांच्या वर्दळीने संपूर्ण अलंकापुरी भक्तिमय वातावरणात न्हात आहे.

माउली मंदिरासमोर गुरु श्रीहैबतबाबांच्या पायरी पूजनाने मंगळवारी (दि. 5) माउलींच्या संजीवन समाधी सोहळ्यास प्रारंभ झाला आहे. या सोहळ्यासाठी मराठवाडा, खानदेश, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रातून वारकर्‍यांचे आगमन होत आहे. जागोजागी राहुट्या उभारण्यात येत असून, मुक्कामाची लगबग दिसून येत होती. दुसरीकडे माउलींच्या मंदिरात दर्शनासाठी वारकर्‍यांची गर्दी होती. मठ, वारकरी संस्था, इतर मंदिरात भजन, कीर्तन, प्रवचनात वारकरी दंग झाल्याचे चित्र आहे. तर सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून वारकर्‍यांसाठी विविध सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी तयारी सुरू होती.

आळंदीमधील सर्व दुकाने सजली आहेत. अनेक वारकरी, भाविक गीता, भागवत पुराण, ज्ञानेश्वरी, हरिपाठ, चांगदेव पासष्टी, संत श्रीनामदेव यांचे अभंग व एकनाथी भागवत, भावार्थ रामायण, तुकारामांची गाथा आदी विविध ग्रंथ, पुस्तकांची खरेदी करताना दिसून येत होते. तर काही टाळ, मृदुंग, वीणा, हार्मोनियम खरेदी करताना दिसत होते तसेच तुळशी, हार, फुले, प्रसादाच्या दुकानांमध्येही गर्दी दिसून
येत होती. इंद्रायणी घाटावर वारकरी, भाविक स्नानासाठी गर्दी करत आहेत.

सिद्धबेटाच्या अजाणवृक्ष बागेत अनेक भाविक ग्रंथ पारायण करत आहेत. यामुळे आळंदी शहरातील वातावरण पूर्णपणे भक्तिमय झालेले दिसून येत आहे. शेजारीच मंडप टाकून ज्ञानेश्वरी सप्ताह, कीर्तन, भजन चालू आहे. राहुट्यांमध्ये कोणी विश्रांती घेत आहे, तर राहुट्यांशेजारी भोजन व्यवस्थेसाठी स्वयंपाकाची तयारी दिसून येत होती. माउली मंदिर, श्रीसंत ज्ञानेश्वर महाराज यांनी चालवलेली भिंत, विश्रांतवड व सिद्धबेट येथे दर्शनासाठी भाविकांची गर्दी होत आहे. त्यामुळे आळंदी शहरातील वातावरण पूर्णपणे भक्तिमय झालेले दिसून येत आहे.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT