Alandi Palkhi Prastan Sohala Pudhari
पुणे

Alandi Palkhi Prastan Sohala: इंद्रायणीच्या पुरातही आळंदी भक्तिरसात दंग; माउलींच्या पालखी प्रस्थानाला वारकऱ्यांचा उत्साह कायम

पावसाच्या सरी, तुळशी वृंदावन आणि ‘ज्ञानोबा माउली’च्या जयघोषाने आळंदीनगरी दुमदुमली; प्रशासनाच्या आवाहनामुळे गर्दी काहीशी कमी

पुढारी वृत्तसेवा

​प्रसाद जगताप

आळंदी: रिमझिम पडणारा पाऊस, डोईवर पवित्र तुळशी वृंदावन, हातामध्ये डौलणारी भगवी पताका, टाळांचा अखंड झंकार आणि मुखी 'ज्ञानोबा माउली'चा जयघोष... अशा भक्तिमय वातावरणात संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माउलींच्या आळंदीनगरीत पालखी प्रस्थानाचा सोहळा बुधवारी (दि. ८) रंगला. यंदा निसर्गाचे आव्हान आणि प्रशासकीय नियमांमुळे आळंदीत दरवर्षीसारखी अथांग गर्दी नसली, तरी उपस्थित वारकऱ्यांचा उत्साह मात्र तसूभरही कमी झालेला दिसला नाही.

गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या संततधारेमुळे इंद्रायणीमातेला मोठा पूर आला आहे. नदीचे पाणी पात्राबाहेर पडून घाट आणि लगतच्या परिसराला वेढत असल्याने प्रशासनाने सुरक्षेच्या कारणास्तव वारकऱ्यांच्या संख्येवर काही मर्यादा घातल्या आहेत. देवस्थान प्रशासनाकडून देखील सुरक्षेच्या कारणास्तव आळंदीमध्ये न येण्याचे आवाहन करण्यात आले होते. खबरदारीचे उपाय म्हणून यंदा आळंदीत दाखल झालेल्या भाविकांची संख्या नेहमीपेक्षा काहीशी कमी जाणवत आहे. मंदिर परिसर आणि घाटांवर पोलिसांचा चोख बंदोबस्त होता.

भाविकांना सुरक्षित राहण्याच्या सूचना सातत्याने दिल्या जात होत्या. ​जरी आळंदीत गर्दी कमी असली, तरी ज्ञानेश्वर महाराज मंदिर परिसर आणि आजूबाजूच्या गल्ल्यांमध्ये भक्तीचा महापूर ओसंडून वाहत आहे. पावसाच्या थंडगार सरी अंगावर झेलत माउलींचे वारकरी मंदिराच्या दिशेने पावले टाकत आहेत. विठ्ठलभेटीची आस आणि माउलींवरील अढळ श्रद्धा, यामुळे येथील वातावरणातील चैतन्य अधिकच गडद झाले आहे. प्रशासनाच्या आव्हानांना प्रतिसाद देत आणि निसर्गाशी जुळवून घेत वारकरी आता माउलींच्या पालखीसोबत पंढरीच्या वाटेवर निघण्यासाठी पूर्णपणे सज्ज झाल्याचे चित्र बुधवारी दिसले.

पूर पाहण्यासाठी आणि कॅमेऱ्यात टिपण्यासाठी गर्दी

इंद्रायणीमातेला आलेला पूर आणि रिमझिम पाऊस, या निसर्गरम्य वातावरणाचे फोटो-व्हिडीओ काढण्यासाठी आळंदीत तरुण आणि भाविकांची मोठी गर्दी झाल्याचे पाहायला मिळाले. पुराच्या पार्श्वभूमीवर माउलींच्या मंदिराचा परिसर कॅमेऱ्यात कैद करण्याचा उत्साह दिसून येत होता. मात्र, येथे पोलिस बंदोबस्त होता. त्यांनी या वेळी सुरक्षिततेची काळजी घेण्याचे आवाहन केले.

आळंदी भक्तिरसात न्हाहली

रिमझिम पाऊस, डोईवर तुळशी वृंदावन आणि हाती विठ्ठलाची पताका घेतलेल्या वारकऱ्यांमुळे आळंदीनगरीत चैतन्य पसरले आहे. इंद्रायणीचा पूर आणि प्रशासकीय आव्हानांमुळे यंदा भाविकांची संख्या काहीशी कमी असली, तरी उपस्थित वारकऱ्यांचा उत्साह ओसंडून वाहत होता. 'ज्ञानोबा माउली'च्या अखंड जयघोषाने, टाळ-मृदंगांच्या गजराने संत ज्ञानेश्वर मंदिर परिसर दुमदुमून गेला असून, संपूर्ण आळंदी भक्तिरसात न्हाऊन निघाल्याचे या वेळी पाहायला मिळाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT