Wari Pudhari
पुणे

Alandi Palkhi Departure: आळंदी पालखी प्रस्थानापूर्वी दिलासा; इंद्रायणीवरील पुलांवरील पाणी ओसरले, पर्यायी मार्गही तयार

मुसळधार पावसामुळे प्रशासन सतर्क; पूरस्थितीनुसार पालखी मार्गाबाबत अंतिम निर्णय आज

पुढारी वृत्तसेवा

आळंदी: संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांच्या पायी वारी पालखी प्रस्थान सोहळ्यासाठी आळंदी देवस्थानकडून जय्यत तयारी सुरू आहे. गेल्या दोन दिवसांपासून आळंदी शहरात अतिवृष्टीसदृश पाऊस झाल्याने पुण्याकडे जाणारे शहरातील तिन्ही पूल पाण्याखाली गेले होते. मात्र, मंगळवारी (दि. ८) सकाळी १० वाजल्यापासून पुलावरील पाणी ओसरण्यास सुरुवात झाल्याने प्रशासनाला काहीसा दिलासा मिळाला आहे. तरीही मावळ भागात आणि आळंदी पंचक्रोशीत मुसळधार पाऊस सुरू असल्याने चिंता कायम आहे.

बुधवारी (दि. ८) दुपारी ३ वाजता माउलींच्या पालखीचे प्रस्थान होणार आहे. त्यानंतर रात्री पालखी आळंदीतील आजोळघरी मुक्कामी राहणार असून, गुरुवारी (दि. ९) सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास पुण्याकडे मार्गस्थ होणार आहे. यासाठी शहरातील पूल वाहतुकीसाठी सुरक्षितपणे खुले असणे आवश्यक आहे. मंगळवार आणि बुधवार हे दोन दिवस शिल्लक असल्याने गुरुवारपर्यंत पूल वाहतुकीसाठी खुले होतील, असा अंदाज आहे. मात्र, पुन्हा पाण्याची पातळी वाढून पूल बंद ठेवण्याची वेळ आल्यास पर्यायी मार्गाचा विचार करण्यात येत आहे.

इंद्रायणी नदीवरील वाहतुकीसाठी खुला करण्यात आलेला चऱ्होली खुर्द-चऱ्होली बुद्रुक जोडणारा पूल, चऱ्होली बायपास रस्ता, चऱ्होली फाटा आणि पुढे थोरल्या पादुका मंदिर असा पर्यायी मार्ग विचाराधीन असल्याची माहिती आळंदी देवस्थानचे विश्वस्त योगी निरंजननाथ यांनी दिली. बुधवारची पूरस्थिती पाहून याबाबत अंतिम निर्णय घेण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

देवस्थान व पोलिस प्रशासनाची तातडीची बैठक

शहरात शिरलेले पाणी ओसरू लागल्याने आळंदी नगरपरिषद प्रशासनाने राडारोडा हटविण्याचे काम सुरू केले आहे. इंद्रायणी नदी पुलावर अडकलेली जलपर्णी काढण्यात येत असून, पुलावरील तुटलेले कठडे दुरुस्त करण्याचे नियोजन करण्यात येत आहे. पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर पोलिस प्रशासनाकडून देखील नियोजन सुरू असून, मंगळवारी देऊळवाड्यात देवस्थान आणि पोलीस प्रशासनाची तातडीची बैठक घेण्यात आली. यावेळी पालखी मार्गस्थ करण्याबाबतच्या तयारीचा आढावा घेण्यात आला.

मुसळधार पाऊस सुरूच

एकीकडे इंद्रायणी नदीचे पाणी ओसरण्यास सुरुवात झाली असली, तरी नदी परिसर आणि मावळ भागात मुसळधार पाऊस सुरूच आहे. त्यामुळे पुन्हा नदीला पूर येण्याची शक्यता व्यक्त केली जात असून, पुढील २४ तास महत्त्वाचे ठरणार आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT