आळंदी: आळंदी शहरातील नगरपालिके समोरील चौकात शुक्रवारी सकाळी साडे दहाच्या सुमारास मारहाणीचा थरार घडल्याने एकच खळबळ उडाली.सदर घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने आळंदी शहरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी पूर्वीच्या भांडणाच्या कारणावरून एका रिक्षाचालकावर खंजीराने हल्ला करण्यात आला.या हल्ल्यात सागर दत्तात्रय बडे (वय २२, रा. आण्णाभाऊ साठे नगर, घाटे कॉलनी, देहू फाटा, दिघी) हा तरुण गंभीर जखमी झाला आहे.
या प्रकरणी मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, आरोपी आर्यन नागोराव पंडित (रा. केळगाव) व त्याच्यासोबत असलेल्या अन्य दोन जणांनी मागील भांडणाचा राग मनात धरून सागर बडे याच्यावर खंजीराने वार केले. या हल्ल्यात तो गंभीर जखमी झाला असून त्याला उपचारासाठी पिंपरी येथील यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
घटनेची माहिती मिळताच आळंदी पोलीस ठाण्याच्या तपास पथकाने आरोपींचा शोध सुरू केला आहे. पोलीस अधिकारी व अंमलदारांकडून आरोपींचा शोध घेतला जात असून या घटनेचा पुढील तपास सुरू आहे.