Palkhi Sohala Pudhari
पुणे

Alandi Palkhi: आळंदीत पूरस्थिती; संत ज्ञानेश्वर महाराज पालखी प्रस्थान सोहळ्यात मोठा बदल, भाविकांना न येण्याचे आवाहन

इंद्रायणीच्या महापुरामुळे केवळ मर्यादित वारकऱ्यांनाच प्रवेश; सुरक्षिततेसाठी संस्थानचा महत्त्वपूर्ण निर्णय, पुढील वारीबाबत नंतर सूचना

पुढारी वृत्तसेवा

पुणे: इंद्रायणी नदीला आलेल्या महापुरामुळे आणि राज्यभर सुरू असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या आषाढी वारी पालखी प्रस्थान सोहळ्यात मोठे बदल करण्यात आले आहेत. वारकऱ्यांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीने बुधवारी (८ जुलै) होणारा पालखी प्रस्थान सोहळा अत्यंत मर्यादित उपस्थितीत पार पाडण्याचा निर्णय घेतला असून, सर्वसामान्य भाविकांनी आळंदीस न येण्याचे जाहीर आवाहन केले आहे.

बुधवारी (दि. ८ जुलै) दुपारी ३ वाजता संजीवन समाधी मंदिरात होणाऱ्या पालखी प्रस्थान सोहळ्यासाठी मानाच्या ५६ दिंड्यांमधील प्रत्येकी केवळ १० वारकऱ्यांनाच मंदिर परिसरात प्रवेश दिला जाणार आहे. त्यामुळे एकूण ५६० वारकरी सोहळ्यात सहभागी होणार आहेत. याशिवाय, परंपरेनुसार दिंडीप्रमुख, मानकरी, सेवेकरी आणि प्रतिष्ठित अशा सुमारे ५०० जणांना नारळप्रसादासाठी प्रवेश दिला जाईल.

मानाचे खांदेकरी, कर्मचारी, आरोग्य व स्वच्छता कर्मचारी, तसेच पोलिस यांच्यासह एकूण सुमारे १,६६० व्यक्तींच्या उपस्थितीत पालखी प्रस्थान सोहळा संपन्न होणार आहे. इंद्रायणी नदीचा पूर ओसरला नाही, तर पालखीच्या मार्गातही आवश्यकते नुसार बदल करण्यात येतील, असे पालखी सोहळा प्रमुख आणि विश्वस्त ॲड. राजेंद्र उमाप आणि प्रमुख विश्वस डॉ. भावार्थ देखणे यांनी एका प्रसिद्धिपत्रकाद्वारे दिली आहे.

दरम्यान, सोमवारी (दि. ६) आळंदीतील परिस्थिती अत्यंत गंभीर झाली. इंद्रायणी नदीने धोकादायक पातळी ओलांडल्याने शहरातील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली असून, इंद्रायणी पुलावरील कठडे व वीजखांब पुराच्या पाण्यात वाहून गेले आहेत. आळंदी नगरपरिषदेचे वॉटरहाऊसही पाण्याखाली गेल्याने पिण्याच्या पाण्याची व्यवस्था विस्कळीत झाली आहे. पालखी सोहळ्यासाठी उभारण्यात आलेली दर्शनबारी पुराच्या पाण्यात वाहून गेली असून, अनेक मोबाईल शौचालयांचेही नुकसान झाले आहे. वीजपुरवठा खंडित झाल्याने तसेच तंबू व राहुट्यांच्या जागी चिखलाचे साम्राज्य निर्माण झाल्यामुळे लाखो वारकऱ्यांच्या निवास, स्वच्छता आणि इतर मूलभूत सुविधांची व्यवस्था करणे अशक्य झाले असल्याचे संस्थान कमिटीने स्पष्ट केले आहे.

या पार्श्वभूमीवर सर्व वारकरी आणि भाविकांनी पालखी प्रस्थान सोहळ्यासाठी आळंदीस येऊ नये, असे नम्र आवाहन संस्थान कमिटीने केले आहे. हवामान आणि नैसर्गिक परिस्थितीचा आढावा घेऊन पुढील मुक्कामापासून वारीत सहभागी होण्याबाबत स्वतंत्र निवेदन प्रसिद्ध करण्यात येईल, असेही समितीने स्पष्ट केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT