

सासवड: आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर सासवड (ता. पुरंदर) येथील श्री संत योगीराज चांगावटेश्वर महाराज पालखी सोहळ्याच्या रथासाठी यंदाचा मान यवत (ता. दौंड) येथील ह.भ.प. छबन महादेव कुदळे यांच्या 'सर्जा' आणि 'राजा' या बैलजोडीला देण्यात आला आहे. पालखी सोहळा प्रमुख ह.भ.प. जनार्दन वाबळे यांनी ही माहिती दिली.
रथमान जाहीर झाल्यानंतर पालखी सोहळा समितीच्या वतीने बैलजोडीची विधीवत पूजा करण्यात आली. पांडुरंगाच्या सेवेसाठी मिळालेला हा मान अत्यंत अभिमानास्पद असल्याची भावना कुदळे कुटुंबीयांनी व्यक्त केली.
श्री संत योगीराज चांगावटेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे प्रस्थान रविवार, दि. १२ जुलै रोजी सकाळी ११ वाजता सासवड येथील श्री लक्ष्मीनारायण मंदिरातून पंढरपूरकडे होणार आहे. यंदाच्या पालखी सोहळ्यात नगारखान्याचा मानही यवत येथील ह.भ.प. सर्जेराव आबा दोरगे यांच्या 'सर्जा' आणि 'राजा' या बैलजोडीला बहाल करण्यात आला आहे.
तसेच, पालखीच्या अश्वसेवेचा मान काटेवाडी (ता. बारामती) येथील ह.भ.प. ज्ञानेश्वर कृष्णाजी महाराज काटे यांच्या अश्वाला देण्यात आला आहे. नगारा सेवेकरी म्हणून काशिनाथ कुदळे यांची निवड करण्यात आली असून, श्रींचे पुजारी म्हणून नीलेश शिंदे, तर सेवेकरी म्हणून तत्यम भूषणकर सेवा बजावणार आहेत. मानकऱ्यांची घोषणा करताना पालखी सोहळा प्रमुख ह.भ.प. जनार्दन वाबळे, उपाध्यक्ष ह.भ.प. बापूसाहेब जगताप आणि मुख्य चोपदार ह.भ.प. शशिकांत जगताप उपस्थित होते.