अजितदादा विरुद्ध तावरे, गुरू-शिष्य लढत होणार का? Pudhari
पुणे

Political News: अजितदादा विरुद्ध तावरे, गुरू-शिष्य लढत होणार का?

माळेगाव कारखान्याच्या निवडणुकीचे बिगुल वाजले

पुढारी वृत्तसेवा

प्रा. अनिल धुमाळ

शिवनगर: माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व चंद्रराव आणि रंजन तावरे या गुरू-शिष्यांमध्ये लढत होणार का? शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे पॅनेल उभे राहणार का? याबाबत उत्सुकता लागली आहे.

संचालक मंडळाची पंचवार्षिक निवडणूक कधी लागणार? याबाबतची उत्सुकता संपुष्टात येऊन निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. माळेगाव कारखान्याचा मागील 28 वर्षांचा इतिहास पाहिला तर कारखान्याच्या निवडणुकीत अनेक लढती चुरशीच्या होऊन धक्कादायक निकाल लागले आहेत. (Latest Pune News)

1995 मध्ये राज्यात सत्तांतर होऊन भाजप-शिवसेनेचे सरकार स्थापन झाले होते, त्या वेळी 1997 मध्ये माळेगाव कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक झाली. तत्कालीन समयी सहकारमहर्षी चंद्रराव तावरे त्यांचे शिष्य रंजन तावरे यांनी एकत्र पॅनेल करीत निवडणूक लढवली होती.

त्या पॅनेलचे सारथ्य कारखान्याचे सध्याचे विद्यमान अध्यक्ष अ‍ॅड. केशवराव जगताप यांनी केले होते. त्या वेळी प्रथमच शरद पवारांसह अजित पवारांना धक्का देत तावरे गुरू-शिष्यांचे पॅनेल निवडून आले होते.

सन 2002 मध्ये झालेल्या कारखाना पंचवार्षिक निवडणुकीमध्ये चंद्रराव तावरे यांचे सहकारी वर्गमित्र ज्येष्ठ नेते खा. शरद पवार यांनी पुन्हा सर्वांना एकत्र घेत निवडणूक बिनविरोध केली होती. त्यानंतर 2007 मध्ये झालेल्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये चंद्रराव तावरे यांचे शिष्य रंजन तावरे यांनी बंड करीत खा. शरद पवार, अजित पवार, चंद्रराव तावरे, बाळासाहेब तावरे, अ‍ॅड. केशवराव जगताप या दिग्गज नेत्यांच्या पॅनेलविरोधात निवडणूक लढवून 7 संचालक निवडून आणले होते, हा इतिहास आहे. दरम्यान, 2007 ते 2014 या संचालक मंडळात चंद्रराव तावरे यांचा समावेश नव्हता.

सन 2014 मध्ये राज्यातील सरकार बदलून पुन्हा भाजप-शिवसेनेचे सरकार आले. त्यानंतर 2015 मध्ये माळेगाव कारखान्याच्या झालेल्या पंचवार्षिक निवडणुकीत तावरे गुरू-शिष्यांची तुटलेली जोडी पुन्हा एकत्र येत त्यांनी शरद पवार व अजित पवार यांच्या पॅनेलविरोधात पॅनेल उभे करून निवडून आणले होते, हा देखील इतिहास आहे.

2019 मध्ये राज्यात पुन्हा सत्तांतर होऊन राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना व राष्ट्रीय काँग्रेस यांचे सरकार सत्तेत आले. त्यानंतर 2020 मध्ये झालेल्या माळेगाव साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पॅनेलने तावरे गुरू-शिष्यांच्या पॅनलला धक्का देत विजय संपादन केला.

आता मात्र राज्यात भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट व शिवसेना शिंदे गट यांचे सरकार सत्तेत आहे. अशावेळी माळेगाव कारखान्याच्या निवडणुकीमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच तावरे गुरू-शिष्य एकत्र येणार का? एकमेकांविरोधात उभे ठाकणार? याबाबत सभासदांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. दरम्यान, कारखाना कार्यक्षेत्रातील कष्टकरी शेतकरी समितीने स्वतंत्र पॅनेल उभा करण्याचा घाट घातला आहे.

‘श्री छत्रपती’प्रमाणे गुरू-शिष्य यांना सामावून घेणार का?

दरम्यान, पुणे जिल्ह्यातील माळेगाव कारखान्याशेजारील छत्रपती सहकारी साखर कारखान्याची निवडणूक अंतिम टप्प्यात आली असून, यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपले कट्टर विरोधक पृथ्वीराज जाचक यांच्याबरोबर एकत्र पॅनेल करून छत्रपती कारखाना संकटातून बाहेर काढण्याची भूमिका घेतलेली आहे.

त्या वेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्षा खा. सुप्रिया सुळे यांनी कारखाना संकटात असताना राजकारण नको म्हणून या भूमिकेला समर्थन दिले. आता मात्र माळेगाव कारखान्याच्या निवडणुकीत अजित पवार तसेच तावरे गुरू-शिष्य आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या युगेंद्र पवार यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

शरद पवार गटाच्या भूमिकेकडे लक्ष

उपमुख्यमंत्री अजित पवार व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष एकत्र येण्याची चर्चा सध्या जोरात आहे. असे असताना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची भूमिका नेमकी काय राहणार? याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT