सोमेश्वरनगर: स्वप्नांना वयाचं बंधन नसतं असे म्हणतात.! कमी वयात लग्न होऊन दोन मुलांची आई झालेल्या निंबूत (ता. बारामती) येथील बा. सा. काकडे विद्यालयातील वर्षा शिंदे -भोसले यांनी नुकत्याच झालेल्या दहावीच्या परीक्षेत घवघवीत यश मिळवत आपले पोलिस होण्याचे स्वप्न पूर्ण करण्याच्या उद्देशाने एक पाऊल पुढे टाकले आहे.
देशसेवेचं स्वप्न मनात होतं, पण घरची परिस्थिती आडवी आली; मात्र स्वप्नं जर खरी असतील, तर ती एक दिवस साकार होण्यासाठी दिशा मिळते व ती साकार होतात, असं जगाला दाखवून दिलं आहे निंबुत येथील बाबालाल साहेबराव काकडे विद्यालयातील पठार वस्तीवर राहणार्या माजी विद्यार्थिनी वर्षा शिंदे- भोसले यांनी. (Latest Pune News)
गरीब कुटुंबातील वर्षा शिंदे-भोसले यांना कौटुंबिक अडचणींमुळे शिक्षण थांबवावं लागलं. लहान वयातच तिचं लग्न लावण्यात आलं आणि संसाराची जबाबदारी स्वीकारत तिने दोन मुलांना जन्म दिला. शिक्षण अपूर्ण राहिलं, पण मनात मात्र एक स्वप्न सतत जागं होतं ते म्हणजे पोलिस व्हायचं. देशासाठी काम करायचं.
हे स्वप्न तिच्या मनात भावाकडून रुजलेलं होतं. समीर पप्पू शिंदे हे भारतीय लष्करात कार्यरत असून देशसेवा करत असल्याचा अभिमान तिला नेहमी वाटत असे. भावाच्या कर्तृत्वाने तिच्या मनात देशासाठी काहीतरी करावं, ही भावना अधिकच बळावली.
या स्वप्नाला खर्या अर्थाने दिशा दिली तिच्या मुख्याध्यापिका दीपाली ननावरे यांनी. त्यांनी तिला पुन्हा दहावीत प्रवेश घेण्यास प्रोत्साहित केलं. तब्बल नऊ वर्षे पडलेला अभ्यासातील खंड सतत दिलेल्या प्रोत्साहनामुळे भरून येत होता. समाजाच्या टीका, वयाचा टप्पा, संसाराचा भार हे सर्व बाजूला ठेवून तिने पुन्हा शिक्षण सुरू केलं.
यात तिला तिच्या पतीने आणि कुटुंबाने साथ दिली. या वर्षी दहावीची परीक्षा तिने उत्तम गुणांनी उत्तीर्ण केली. आता तिचं लक्ष पोलिस भरतीकडे आहे आणि ती आत्मविश्वासाने पुढं वाटचाल करत आहे. लष्करात असलेल्या भावाकडून देशसेवेचं बाळकडू मिळालं आणि मुख्याध्यापिका दीपाली ननावरे यांनी योग्य वेळी दिलेल्या प्रेरणेमुळे आज मी इथवर पोहोचले,‘ असं भावनिक उद्गार वर्षा शिंदे-भोसले यांनी काढले.
बा.सा. काकडे विद्यालयाने आतापर्यंत अनेक गरीब मुलींना शिक्षणाच्या सोयी उपलब्ध करून दिल्या आहेत. पुढील अकरावी आणि बारावीचे शिक्षण त्या मु.सा. काकडे महाविद्यालयात घेणार असून यासाठी संस्थेचे अध्यक्ष सतीश काकडे यांनी त्यांना मोफत शिक्षणासाठी सहकार्य केले आहे.
निंबुत ग्रामविकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष सतीश काकडे, उपाध्यक्षा सुप्रिया पाटील, सचिव मदन काकडे, संचालक भीमराव बनसोडे यांनी तिच्या पाठीवर शाबासकीची थाप देत तिच्या पुढील यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.